बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेले कार्य अविस्मरणीय …. प्रा. सुरज आष्टेकर.


बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेले कार्य अविस्मरणीय …. प्रा. सुरज आष्टेकर.
बोईसर (प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालय चिंचणी, डहाणू येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक प्रा. सुरज आष्टेकर यांनी, बाबासाहेबांनी समाजातील गरीब, दलित आणि विशेषतः महिलांसाठी खूप मोठे कार्य केले. तसेच बाबासाहेब एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते प्रा. संजय बहारे यांनी विद्यार्थ्यांच्या विचार, आचार आणि कृतीत आंबेडकरवाद असावा असे मत व्यक्त केले. आंबेडकरवाद सम्यक विचारांचे सूत्र देतो. बुध्दीप्रामाण्यवादी व तर्कशुद्ध बनवतो. आंबेडकरवाद जात, धर्म , पंथ, वंश ,लिंग व देश यांच्या मर्यादा तोडून मानवमुक्ती चे समर्थक बनवतो, सद्भावना जोपासतो, विज्ञानवादी दृष्टीकोण देतो. म्हणून विद्यार्थ्यांनी आंबेडकर यांचा अभ्यास करावा असा मोलाचा संदेश दिला. श्री. शैलेश जाधव यांनी वंदन गीत सादर केले.
या प्रसंगी सौ. वर्षा चुरी, प्रा. चारुशीला बहारे, प्रा. जयकृष्ण राजपूत, प्रा. ममता पाटील, प्रा. प्रतीक्षा जोशी, प्रा. प्रिती राऊत , प्रा. लहू महाजन व रा.से. यो.+2 स्तर चे स्वयंसेवक, तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. एकनाथ पाटील तर सूत्रसंचालन व आभार प्रा. स्वज्वल राऊत यांनी केले.