Uncategorized

वाचनवेल वर्षपूर्ती विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्नज्येष्ठ लेखिका वीणाताई गवाणकर यांच्यासोबत ‘मनमोकळा संवाद’

वायाचनवेल वर्षपूर्ती विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न
ज्येष्ठ लेखिका वीणाताई गवाणकर यांच्यासोबत ‘मनमोकळा संवाद’
पालघर (प्रतिनिधी):
वाचनवेल – द पालघर बुक क्लब व सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचनवेल वर्षपूर्ती विशेष कार्यक्रम अंतर्गत ज्येष्ठ लेखिका वीणाताई गवाणकर यांच्यासोबतचा ‘मनमोकळा संवाद’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चिकूवाडी येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या परिसरात कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच सुरू झाला. कार्यक्रमस्थळी सुरुवातीपासूनच उत्सवी व साहित्यिक वातावरण निर्माण झाले होते. साहित्यप्रेमी विद्यार्थी, शिक्षक, वाचक तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.
शब्दांमधून विचारांची पेरणी करणाऱ्या आणि व्यक्ती-अध्ययनातून मन उलगडणाऱ्या ज्येष्ठ लेखिका वीणाताई गवाणकर यांनी आपल्या प्रदीर्घ साहित्यिक प्रवासातील अनुभवांच्या आधारे साहित्य, जीवनमूल्ये, वाचनसंस्कृती आणि समाजभान यावर अत्यंत मोकळेपणाने संवाद साधला. उपस्थितांनीही मुक्तपणे प्रश्न विचारत आपले विचार मांडले. वैयक्तिक, सामाजिक तसेच साहित्यविषयक प्रश्नांमुळे संवाद अधिक रंगतदार झाला.
या मुक्त संवादामुळे कार्यक्रम केवळ व्याख्यानापुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने एक संवादात्मक साहित्यिक उत्सव ठरला. उपस्थित सर्वच वाचकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. वाचनवेलसारख्या उपक्रमांमुळे साहित्यवाचनाची चळवळ अधिक बळकट होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, मराठी साहित्यातील समकालीन कथाकार व कादंबरीकार प्रसाद कुमठेकर, तसेच सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सांस्कृतिक कार्याध्यक्ष सुधीर दांडेकर हे मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अंकिता, सुविधा, सलोनी, पारितोषिणी, सुप्रिया, आशिष, साक्षी, डॉ. दर्शना म्हात्रे, डॉ. शीला गोडबोले, विजय ठाकूर, विवेक कुडू, रमाकांत पाटील आदी वाचनवेलच्या टीमने केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वाचनवेल – द पालघर बुक क्लब व सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button