Uncategorized

महा आवास अभियानात पालघर जिल्ह्याची सलग तीन वर्षे दमदार कामगिरी

महा आवास अभियानात पालघर जिल्ह्याची सलग तीन वर्षे दमदार कामगिरी


पालघर :(प्रतिनिधी) महा आवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना प्रभावीपणे राबविताना पालघर जिल्ह्याने सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवत विविध गटांत विभागस्तरावर मानांकन मिळवले आहे. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथील सिडको कार्यालय सभागृहात कोकण विभागीय स्तरावर आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सन २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना – सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद पालघरने तृतीय क्रमांक मिळविला, तर राज्य पुरस्कृत आवास योजना – सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात द्वितीय क्रमांक पटकावला.
सन २०२२-२३ मध्ये राज्य पुरस्कृत आवास योजना – सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद पालघरने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत गटातही जिल्ह्यातील संस्थांनी उद्दिष्टपूर्ती, गती व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीच्या जोरावर मानांकन मिळवले. वाळू उपलब्धता या घटकात तहसीलदार, जव्हार यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
सन २०२३-२४ मध्ये पालघर जिल्ह्याने उल्लेखनीय झेप घेत प्रधानमंत्री आवास योजना – सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात प्रथम क्रमांक मिळविला. पंचायत समिती गटात विक्रमगड प्रथम, वाडा द्वितीय व पालघर तृतीय क्रमांकावर राहिले. ग्रामपंचायत गटात मोज (ता. वाडा) प्रथम व खुडेद (ता. विक्रमगड) द्वितीय क्रमांकावर राहिली. राज्य पुरस्कृत आवास योजना – सर्वोत्तम जिल्हा परिषद गटातही जिल्हा परिषद पालघरने प्रथम क्रमांक पटकावला, तर पंचायत समिती वाडा हिने प्रथम क्रमांक मिळविला.
या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. पालघर) सिद्धाराम सालीमठ, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारले. यावेळी डॉ. माणिक दिवे (अतिरिक्त आयुक्त – विकास), डॉ. राजाराम दिघे (संचालक, ग्रामीण गृहनिर्माण), डॉ. प्रदीप घोरपडे (सहाय्यक आयुक्त) व प्रसिद्ध वक्ते प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “महा आवास अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सन्मानाने निवारा उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या समन्वयातून हे यश शक्य झाले असून पुढील काळातही अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
याचवेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही भावना व्यक्त करत सांगितले की, “ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वेळेत व दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने संघभावनेतून काम केले. नियोजनबद्ध अंमलबजावणी, सातत्यपूर्ण आढावा व तळागाळातील समन्वय यामुळे हे यश शक्य झाले. पुढील काळातही ही गुणवत्ता कायम राखण्याचा प्रयत्न राहील.”
पालघर जिल्ह्याच्या या सलग तीन वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोकण विभागात जिल्ह्याची मान उंचावली असून सर्व स्तरांतून जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button