Uncategorized

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्य – खासदार डॉ. हेमंत सवरा

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्य – खासदार डॉ. हेमंत सवरा


पालघर (प्रतिनिधी): “योजनांच्या निकषांप्रमाणे काम करणे अत्यावश्यक असून योजना केंद्र शासनाच्या असोत किंवा राज्य शासनाच्या, त्या प्रभावीपणे राबविणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करता येईल,” असे प्रतिपादन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केले.
केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालिका (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. रूपाली सातपुते, प्रकल्प अधिकारी जव्हार आणि डहाणू, पालघर, वाडा, विक्रमगड, नगराध्यक्ष तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ. रूपाली सातपुते यांनी दिशा समितीचा उद्देश स्पष्ट केला. केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी मार्गदर्शक सूचनांनुसार होत आहे का आणि निधीचा योग्य व पारदर्शक वापर केला जात आहे का, याचा आढावा घेणे हा समितीचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत रोजगार हमी योजनेअंतर्गत स्वयंरोजगार कामे, तालुकानिहाय बांबू लागवड आणि संबंधित विभागांची अंमलबजावणी यंत्रणा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मोखाडा व जव्हार तालुक्यातील रेशीम लागवडीबाबत माहिती सादर करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. सवरा यांनी संबंधित विभागांनी रेशीम शेतीचे प्रभावी सादरीकरण करावे, जेणेकरून इतर शेतकरी त्यातून प्रेरणा घेऊ शकतील, असे निर्देश दिले.
दीनदयाळ अंत्योदय योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत ‘उमेद’ अभियान, ‘लखपती दीदी’ उपक्रम, स्वयंसहायता गटांना देण्यात येणारे खेळते भांडवल व समुदाय संसाधन निधी याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पूर्ण, अपूर्ण व प्रगतीपथावरील घरकुलांची स्थिती तसेच पीएम जनमन आवास प्लस योजनेचाही आढावा घेण्यात आला.
कृषी विभागांतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना व पीएम किसान सन्मान निधी योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, ग्रामपंचायत विकास आराखडे, ग्रामीण पाणीपुरवठा व जलजीवन मिशन, जलसंधारण, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, आरोग्य विभागातील मंजूर व रिक्त पदांची स्थिती, शिक्षण विभागातील मध्यान्ह भोजन व समग्र शिक्षा अभियान, कौशल्य विकास, खनिज प्रतिष्ठान निधी, दिव्यांग सक्षमीकरण, लघु व मध्यम उद्योग, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच खेलो इंडिया व युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या योजनांचाही सखोल आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयाची गरज अधोरेखित केली. बैठका केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष कामे पूर्ण करून जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिशा समिती बैठकीदरम्यान पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद परिसरातील सोलार कार शेड पार्किंग व दुचाकी सोलार पार्किंगचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
बैठकीचे आयोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी संबंधित विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button