सिकलसेल आजारमुक्तीसाठी ‘अरुणोदय’ विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावासहाय्यक संचालक डॉ. सुहास माने यांची पालघर जिल्ह्यास भेट

सिकलसेल आजारमुक्तीसाठी ‘अरुणोदय’ विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा
सहाय्यक संचालक डॉ. सुहास माने यांची पालघर जिल्ह्यास भेट
पालघर (प्रतिनिधी) :
सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करून सिकलसेलमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अरुणोदय सिकलसेल विशेष तपासणी मोहिमे’च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (वैद्यकीय) तथा विभागीय नोडल अधिकारी, अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान मा. डॉ. सुहास माने यांनी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी पालघर जिल्ह्यास भेट दिली.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्झे अंतर्गत भोईरपाडा (पोस्ट कुर्झे, ता. विक्रमगड) येथे सिकलसेल आजाराने ग्रस्त रुग्णांना प्रत्यक्ष गृहभेटी देऊन त्यांच्या आरोग्याची पाहणी केली. रुग्णांना सिकलसेल आजाराबाबत आवश्यक काळजी, नियमित औषधोपचार घेण्याचे महत्त्व तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. सिकलसेल रुग्णांना देण्यात आलेल्या ओळखपत्र (कार्ड) वितरणाचीही पाहणी करण्यात आली. कोणतीही अडचण भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्झे येथे त्वरित संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी रुग्णांच्या समस्या व अडचणींबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अरुणोदय विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते ४० वर्षे वयोगटातील उर्वरित सर्व नागरिकांची Solubility व HPLC तपासणी करून घेण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
तसेच सिकलसेल रुग्ण व वाहक यांना प्रत्यक्ष गृहभेटी देऊन त्यांना नियमित औषधोपचार मिळत आहेत का याची खात्री करावी, योग्य समुपदेशन करावे तसेच दोन रंगीत कार्डधारक व्यक्तींनी परस्पर विवाह करू नये याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून सिकलसेल आजाराविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या आढावा बैठकीस मा. डॉ. वैदही माळवी (DRCHO), विनोद रडे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. महेश जाधव (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कुर्झे), इंदल जाधव (जिल्हा सिकलसेल समन्वयक) तसेच इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.