Uncategorized

जव्हारमध्ये दोन दिवसीय क्रीडा महोत्सव संपन्न
जव्हार, (प्रतिनिधी)दि. 20 फेब्रुवारी : प्रकल्पस्तरीय कर्मचारी व अधिकाऱ्यांमधील संघभावना, समन्वय आणि कार्यऊर्जा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा चैतन्यमय वातावरणात समारोप झाला. जव्हार येथील भारतरत्न राजीव गांधी मैदान येथे रंगलेल्या या स्पर्धांमध्ये उत्साह, क्रीडाभावना आणि टीमवर्कचा संगम अनुभवायला मिळाला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत आयोजित या स्पर्धांचा समारोप प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विविध संघ व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना चषक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी यांनी केले. स्पर्धा आयोजनामागील उद्दिष्ट, नियोजन प्रक्रियेत आलेले अनुभव आणि सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान यांचा त्यांनी मार्मिक आढावा घेतला. प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदाऱ्या पार पाडताना झालेली धावपळ आणि त्यातून साधलेले यश त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, धावणे, हँडबॉल, क्रिकेट आदी विविध क्रीडा प्रकारांत रंगलेल्या सामन्यांनी उपस्थितांना थरारक क्षण अनुभवायला मिळाले. विजयी संघांना चषक प्रदान करण्यात आले, तर वैयक्तिक स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. अपूर्वा बासूर यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानले. “आपल्या चेहऱ्यांवरील समाधान आणि उत्साह पाहता स्पर्धेचा उद्देश सफल झाल्याचे स्पष्ट जाणवते,” असे त्या म्हणाल्या. दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीमुळे काही शिक्षकांना सहभागी होता आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली; मात्र भविष्यात अधिक व्यापक सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
या सोहळ्यास सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ शेवाळे यांनी आभार प्रदर्शन केले. अखेरीस ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत सामूहिकरित्या गाऊन प्रेरणादायी वातावरणात क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button