Uncategorized

ग्लोबल कोकण महोत्सवात ‘नाती रक्ताची’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शिरगाव बीचवर प्रेक्षकांची गर्दी

ग्लोबल कोकण महोत्सवात ‘नाती रक्ताची’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शिरगाव बीचवर प्रेक्षकांची गर्दी


पालघर (प्रतिनिधी)
ग्लोबल कोकण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरगाव बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी चित्रपट ‘नाती रक्ताची’च्या विशेष प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सागराच्या साक्षीने रंगलेल्या या खास संध्याकाळी नात्यांच्या भावविश्वाने उपस्थितांची मने जिंकली.
दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्यातील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भावनिक आशय, प्रभावी कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक चित्रपटात पूर्णपणे गुंतून गेले.
पुरस्कारप्राप्त या चित्रपटाचे निर्माता रमेश गणपत माळी, लेखक अनंत धर्मा भोईर, दिग्दर्शक विजय पांडुरंग शेडगे आणि सह-दिग्दर्शक जितेंद्र हिरालाल भगत यांनी उपस्थितांशी संवाद साधत चित्रपट निर्मितीमागील अनुभव शेअर केले. चित्रपटातील कलाकारही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते.
विशेष म्हणजे चित्रपटाचे निर्माता हे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील स्थानिक असल्याने उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. नात्यांची ऊब, कोकणाचा सुगंध आणि भावनांचा सुंदर प्रवास अनुभवायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.
ग्लोबल कोकण महोत्सवातील हा चित्रपट प्रदर्शन कार्यक्रम यशस्वी ठरला असून, अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे स्थानिक कला आणि कलाकारांना निश्चितच बळ मिळेल, असा सूर उपस्थितांतून उमटला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button