लुपिन लिमिटेड मध्ये ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोप संपन्न.


लुपिन लिमिटेड मध्ये ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोप संपन्न.
जनसहभाग, प्रशिक्षण व सशक्तीकरणातून ‘शून्य अपघात’ साध्य करण्याचे आवाहन.
बोईसर (प्रतिनिधी ) :तारापूर औद्योगिक क्षेत्रातील लुपिन लिमिटेड मध्ये ५५ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा समारोप सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पालघरचे सह-निदेशक माधव तोटेवाड तसेच सहाय्यक निदेशक श्रीनिवास सब्बन उपस्थित होते.
दि. १३ मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमात कंपनीच्या सभागृहात व्यवस्थापन अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ सुरक्षा अधिकारी शशिन पाटील यांनी सांगितले की, “हा सुरक्षा सप्ताहाचा औपचारिक समारोप असला तरी कंपनीत ‘सुरक्षा महिना’ म्हणून पुढेही उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.” त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या यावर्षीच्या ‘जनसहभाग, प्रशिक्षण व सशक्तीकरण’ या संकल्पनेद्वारे उच्च दर्जाची औद्योगिक सुरक्षा साध्य करता येईल, असे नमूद केले.
सुरक्षा सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांची माहिती संदीप टकले यांनी दिली. यामध्ये सुरक्षा घोषवाक्य, पोस्टर स्पर्धा, कवी संमेलन, प्रश्नमंजुषा, नाटिका, स्व-नियंत्रित श्वसन उपकरण प्रात्यक्षिक, जनजागृती उपक्रम, रांगोळी, महिला सुरक्षा जनजागृती, अग्निशमन प्रशिक्षण तसेच व्हिडिओ स्पर्धांचा समावेश होता. तसेच लहान मुलांसाठी पोस्टर व वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीनिवास सब्बन यांनी कर्मचाऱ्यांच्या उत्साहाचे कौतुक करताना सांगितले की, लुपिनमधील कर्मचारी कला व सर्जनशीलतेच्या माध्यमातून प्रभावी सुरक्षा जनजागृती करतात. सलग दोन वर्षे या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
लुपिन लि. तारापूरचे प्रमुख डॉ. संजय बेरड यांनी आपल्या भाषणात सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर दिला. तसेच अपघातांच्या कारणांचे सखोल विश्लेषण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा, आरोग्य व पर्यावरण विषयक नियमांचे काटेकोर पालन करून ‘शून्य अपघात’ साध्य करण्याचे आवाहन केले.
मुख्य अतिथी माधव तोटेवाड यांनी कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेचे व कर्मचाऱ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. “लहान असो वा मोठा, प्रत्येक अपघात गंभीर परिणाम घडवतो. त्याचा परिणाम केवळ संबंधित व्यक्तीवरच नव्हे, तर कुटुंब, सहकारी व संपूर्ण उद्योगावर होतो,” असे त्यांनी सांगितले. औद्योगिक अपघातांचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होतो, असे त्यांनी अधोरेखित केले.
अपघातांचे स्वरूप महासागरातील हिमनगासारखे असते या वरून दिसणारा भाग लहान असला तरी त्यामागे मोठी व गंभीर कारणे दडलेली असतात, असे उदाहरण देत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.