Uncategorized

‘कॉफी विथ सीईओ’ उपक्रमातून निपुण पालघर गुणवंतांचा गौरवनिपुण महाराष्ट्र व निपुण पालघर अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

‘कॉफी विथ सीईओ’ उपक्रमातून निपुण पालघर गुणवंतांचा गौरव
निपुण महाराष्ट्र व निपुण पालघर अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात


पालघर : (प्रतिनिधी)जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत ‘निपुण महाराष्ट्र’ व ‘निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान’ (सन २०२५-२६) अनुषंगाने पारितोषिक वितरण समारंभ वीर बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद पालघर येथे उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘कॉफी विथ सीईओ’ ही कार्यक्रमाची विशेष थीम ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच ‘हिंद की चादर’ या गीताने करण्यात आली. त्यानंतर डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने यांनी प्रस्तावना सादर करत उपक्रमामागील उद्दिष्टे, जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती आणि गुणवत्तावाढीचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला.
‘निपुण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत एकूण २३ शाळांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ‘सुपर शाळा’ म्हणून शंभर टक्के गुण प्राप्त करणाऱ्या ९ शाळा तसेच ९० ते ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या १४ शाळांचा समावेश होता. ‘निपुण पालघर’ अंतर्गत ८ शिक्षक आणि ९ शाळांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १६ गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे विद्यार्थी, ‘इन्स्पायर अवॉर्ड’मध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी, तसेच मागील दोन वर्षांत राज्यस्तर किंवा जिल्हास्तरावरील कला, क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा समावेश होता.
स्वच्छ व हरित विद्यालय मानांकन प्राप्त केलेल्या ८ शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पाणीपुरवठा, शौचालय सुविधा, साबणाने हात धुण्याची सवय, ऑपरेशन व देखभाल, वर्तन बदल आणि क्षमता बांधणी या प्रमुख निकषांवर आधारित सखोल मूल्यांकनानंतर शाळांची निवड करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर आणि डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने तसेच जिल्हा समन्वयक तानाजी डावरे यांना विशेष योगदानाबद्दल गौरविले.
यावेळी प्रतिपादन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे म्हणाले, “मुलांना मिळालेला हा सत्कार म्हणजे अनेक यशस्वी वाटचालींचे बीजारोपण असते. अशा गौरवातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. शिक्षक आपल्या स्वतःच्या मुलांपेक्षा शाळेतील विद्यार्थ्यांना यश मिळाल्यावर अधिक आनंदी होतात. कारण ही संपूर्ण पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांच्या हातात आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मुले प्रगतिशील व्हावीत, यासाठी हा उपक्रम प्रभावीपणे आणि सातत्याने राबविण्याचे काम शिक्षकांनीच करायचे आहे.”
कार्यक्रमास डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने, विनोबा ॲप ओपन लिंक फाउंडेशनचे श्रीकांत सर, उपशिक्षणाधिकारी ब्रीजेश गुप्ता, जिल्हा समन्वयक तानाजी डावरे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button