Uncategorized

१०२ रुग्णवाहिका चालकांच्या हक्कासाठी ‘भूमिपुत्र एल्गार’ आक्रमक;मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज रानडे यांचे सकारात्मक आश्वासन!

१०२ रुग्णवाहिका चालकांच्या हक्कासाठी ‘भूमिपुत्र एल्गार’ आक्रमक;
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज रानडे यांचे सकारात्मक आश्वासन!

पालघर/प्रसाद भालेराव
पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा कणा मानल्या जाणाऱ्या १०२ रुग्णवाहिका चालकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आता ‘भूमिपुत्र एल्गार संघटना’ मैदानात उतरली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने अहोरात्र सेवा बजावणाऱ्या या चालकांना थेट शासन सेवेत सामावून घ्यावे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना किमान वेतन व महागाई भत्ता लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज रानडे यांना जाहीर निवेदन देण्यात आले. या निवेदनावर चर्चा करताना डॉ. मनोज रानडे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या प्रश्नाबाबत ठोस आणि सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पालघर जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेले हे सर्व चालक भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सभासद आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळवून देण्यात या चालकांचे योगदान मोलाचे आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन आता नवीन निविदा प्रक्रिया राबवून या चालकांना पुन्हा एकदा कंत्राटदाराच्या माध्यमातून कामावर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. हा प्रकार शासनाच्या धोरणाशी आणि न्यायालयीन आदेशांशी विसंगत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी वाहनचालकांना रिक्त पदांवर समायोजनाने शासन सेवेत सामावून घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
तसेच, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ७४२४/२०२१ आणि अवमान याचिका क्र. ७२९/२०२५ मध्ये दिलेल्या आदेशानुसार, या चालकांना नियमित किमान वेतन श्रेणी, महागाई भत्ता आणि थकबाकी (Arrears) मिळणे आवश्यक आहे. आदिम शक्ती प्रमुख तथा पालघर जिल्हा सरचिटणीस स्वप्निल वाघ यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, “आमचे भूमिपुत्र १०-१५ वर्षांपासून २४-२४ तास सेवा देत आहेत. जर प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून कंत्राटदारी लादण्याचा प्रयत्न केला, तर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज रानडे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे चालकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवेदनावेळी जिल्हा सरचिटणीस स्वप्निल वाघ, कार्याध्यक्ष सुनील लोणे, अध्यक्ष प्रमोद पवार यांच्यासह सदू झाटे, प्रकाश वायडा, अजय दुमाडा, संपत डावरे, सागर न्हानवे, स्वप्नील जाधव आणि दीपक पवार उपस्थित होते. प्रशासनाच्या आगामी निर्णयाकडे आता सर्व रुग्णवाहिका चालकांचे डोळे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button