लाच प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त
लाच प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त
पालघर(प्रतिनिधी), दि. १८ : लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा अखेर समाप्त करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाड अंतर्गत असलेल्या उपकेंद्रांमध्ये भाडेतत्त्वावर नेमलेल्या इको गाडीच्या बिलासाठी लाच मागितल्याचा गंभीर आरोप डॉ. विजय माणिक सांगळे यांच्यावर होता.
या प्रकरणी दि. १७ मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डहाणू तालुक्यातील आशागड येथे सापळा रचून डॉ. सांगळे यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संबंधित बातमी वर्तमानपत्रे तसेच समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली होती.
डॉ. सांगळे हे आंबेसरी येथील भरारी पथकात कंत्राटी स्वरूपात कार्यरत होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी तातडीने कारवाई करत त्यांच्या सेवासमाप्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविला.
प्रस्तावाच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तातडीने आदेश निर्गमित करत डॉ. विजय माणिक सांगळे यांची सेवा समाप्त केली आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.