Uncategorized

योजनांची माहिती देणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन; स्टिकर-पोस्टरचे अनावरण व सांस्कृतिक-क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव

योजनांची माहिती देणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन; स्टिकर-पोस्टरचे अनावरण व सांस्कृतिक-क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव

पालघर (प्रतिनिधी)दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या विविध योजनांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. त्याचबरोबर कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच कृषी विभाग जिल्हा परिषद सेस फंड योजना यांची माहिती देणाऱ्या स्टिकर-पोस्टरचेही प्रकाशन करण्यात आले. जिल्हा परिषद आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान हे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीकमसलत, (सा.) उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, (पंचाय )जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर तसेच कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर जिल्हा परिषदेच्या एका विभागाची योजना सोप्या भाषेत मांडण्यात आली असून अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच नागरिकांसाठी ही दिनदर्शिका मार्गदर्शक ठरणार आहे. तसेच स्टिकर-पोस्टरच्या माध्यमातून कृषी विभागाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेमार्फत आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळवलेल्या विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळालेल्या तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या योजना एकत्रितपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या दृष्टीने प्रकाशित करण्यात आलेली दिनदर्शिका तसेच कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेले माहितीपर स्टिकर-पोस्टर हे उपयुक्त आणि परिणामकारक माध्यम ठरणार आहेत. तसेच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण होते.” असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button