आगरी समाज भवन, केळवे रोड येथे प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न.



आगरी समाज भवन, केळवे रोड येथे प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न
केळवा (प्रतिनिधी)केळवे रोड येथील आगरी समाज भवनाचा प्रथम वर्धापन दिन आज शनिवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता इमारतीच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कबड्डी सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.
आगरी समाजाची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्मरणिकेसाठी साहित्य रमेश भोईर यांनी दिले असून साहित्यिक संजय पाटील (मायखोपकर) यांचेही योगदान लाभले. या वेळी सूर्यकांत पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास मायखोप गावचे सरपंच महेंद्र किणी, उपसरपंच स्वप्निल भोईर, जगदिश किणी, विश्वनाथ सर, योगेश पाटील, रामदास पाटील, दत्तात्रेय भोईर, राजन घरत सर, परेश घरत, पत्रकार प्रमोद पाटील, पांडुरंग किणी, जयवंत किणी यांच्यासह आगरी समाजातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महिला भगिनींची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिलांना साड्यांची भेट देण्यात आली.
तसेच आजूबाजूच्या परिसरातील विविध गावांतील आगरी समाजबांधव, पत्रकार मित्र, साहित्यिक तसेच डहाणू–वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सदस्य यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवली. उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
हा प्रथम वर्धापन दिन कार्यक्रम सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा ठरला.