पालघर जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरूमैदानी चाचण्या 11 ते 25 फेब्रुवारीदरम्यान
पालघर जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू
मैदानी चाचण्या 11 ते 25 फेब्रुवारीदरम्यान
पालघर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई पदाच्या 158 रिक्त जागा तसेच 7 चालक पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी एकूण 9,109 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये 7,763 पुरुष व 1,446 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
सदर भरती प्रक्रिया मैदानी चाचणी व लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. यामधील पहिला टप्पा असलेली मैदानी चाचणी दिनांक 11 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पोलीस परेड ग्राउंड, कोळगाव, पालघर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आली आहे.
उमेदवारांच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्टेशन व पालघर बस स्थानक येथे पोलीस भरती मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आला असून आवश्यक सूचनांचे फलकही लावण्यात आले आहेत.
दूरवरून येणाऱ्या उमेदवारांसाठी पालघर जिल्हा पोलीस दलामार्फत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महिला उमेदवारांसाठी : अंबामाता मंदिर, पाचबत्ती नाका, पालघर
पुरुष उमेदवारांसाठी : पद्मनाभ स्वामी मंदिर, टेंभोडे
उमेदवारांसाठी : उमरोळी ग्रामपंचायत हॉल, उमरोळी
मैदानी चाचणीदरम्यान उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे डिजिटल स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक साधने किंवा स्पाईक शूज वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच डमी उमेदवार, उत्तेजक द्रव्यांचा वापर अथवा अन्य गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर पोलीस भरती प्रक्रिया पूर्णतः निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून कोणत्याही प्रकारच्या दलाली, आमिष, पैशांची मागणी अथवा फसवणुकीस बळी न पडण्याचे आवाहन पालघर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
अशा प्रकारचा संशय आढळून आल्यास तात्काळ
पोलीस नियंत्रण कक्ष – 02525-205300 / 205314,
हेल्पलाईन – 8669604004 / 8669604070
किंवा
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – 02525-297297
या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.