Uncategorized

भूमिपुत्र एल्गार संघटनेची मोखाडा तालुका कार्यकारिणी जाहीर;शक्य तिथे सहकार्य आणि आवश्यक तेथेच संघर्ष-प्रमोद पवार

भूमिपुत्र एल्गार संघटनेची मोखाडा तालुका कार्यकारिणी जाहीर;शक्य तिथे सहकार्य आणि आवश्यक तेथेच संघर्ष-प्रमोद पवार

मोखाडा/प्रसाद भालेराव
शेतकरी, कामगार आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी कार्य करणाऱ्या “भूमिपुत्र एल्गार संघटना, महाराष्ट्र” या संघटनेने आपली मोखाडा तालुका कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या उपस्थितीत मोखाडा येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा;
स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही आदिवासी, कष्टकरी, कुणबी, आगरी आणि कोळी समाजातील सर्वसामान्य भूमिपुत्र मूलभूत सोयीसुविधा, शिक्षण आणि रोजगारापासून वंचित आहेत. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून, या गंभीर समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना अधिक आक्रमकपणे कार्य करेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नूतन कार्यकारिणी (प्रभारी नियुक्ती);
तालुक्यातील संघटन वाढवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे:
मोखाडा तालुका कार्यकारिणीमध्ये गणेश हाडकु माळी यांची तालुका अध्यक्षपदी, रामा मंगा होला यांची तालुका कार्याध्यक्षपदी, तर अंकुश गंगा वाघ व कैलास भिका पढेर यांची तालुका उपाध्यक्षपदी प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी विजय देऊ नडगे यांच्याकडे, तर सहसचिवपदी सुनील वसंत घुमल यांची निवड झाली आहे. शहराच्या नेतृत्वासाठी दौलत सकू घोडगा यांची मोखाडा शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागीय शक्ती प्रमुखांमध्ये भावेश रामू पढेर यांची युवा शक्ती प्रमुखपदी, नरेश सुरेश माळी यांची युवा शक्ती सचिवपदी, देवराम बच्चू निरगुडे यांची किसान शक्ती प्रमुखपदी, पुनम बुध्या घाटाळ यांची नारी शक्ती प्रमुखपदी आणि विनोद सोमनाथ वाघ यांची आदिम शक्ती प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून मधुकर बोडू पाठवे, भास्कर सोमा पढेर, जगन नवशा दिद्या, चंद्रकांत घाटाळ, महेंद्र मंगा दखने आणि सचिन नक्सु नडगे यांचा समावेश करण्यात आला आहे.
या बैठकीस अध्यक्ष प्रमोद पवार, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती राज्यप्रमुख स्वप्नील वाघ यांसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
‘सहकार्य आणि संघर्ष’ या सूत्रावर कामाचा निर्धार
निवडीनंतर बोलताना संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी सांगितले की, “येत्या काळात आदिवासींचे शिक्षण, कुपोषण आणि रोजगार या मुद्द्यांवर संघटना प्राधान्याने काम करेल. ‘शक्य तिथे सहकार्य आणि आवश्यक तिथे संघर्ष’ या सूत्राच्या आधारावर संघटना वाटचाल करणार असून, लोकशाही मार्गाने पत्रव्यवहार आणि आंदोलने करून प्रश्न सोडवले जातील”.
अल्पवधीतच ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत विस्तारलेल्या या संघटनेकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. मोखाड्यातील या नवीन कार्यकारिणीमुळे तालुक्यातील शोषित आणि अन्यायग्रस्त जनतेला एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button