Uncategorized

फिलिप्स–रचिनचा वादळी खेळ; न्यूझीलंडचा कॅनडावर ८ गडी राखून दणदणीत विजय

फिलिप्स–रचिनचा वादळी खेळ; न्यूझीलंडचा कॅनडावर ८ गडी राखून दणदणीत विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील ३१ व्या सामन्यात गट ‘ड’ मध्ये न्यूझीलंडने कॅनडावर ८ गडी राखून जबरदस्त विजय मिळवत आपली दावेदारी अधिक मजबूत केली. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने अवघ्या १५.१ षटकांत २ गडी गमावत १७६ धावांचे लक्ष्य सहज पार केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या कॅनडासाठी युवराज सम्राने अप्रतिम फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. त्याने ६५ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११० धावांची झंझावाती शतकी खेळी साकारली. दिलप्रीत बज्वाने ३६ धावांची उपयुक्त साथ दिली. नवनीत धालीवालने १० धावा केल्या. अखेरीस डिलन हायलिगरने अवघ्या ३ चेंडूंमध्ये नाबाद ८ धावा करत संघाला १७३ धावांपर्यंत पोहोचवले. न्यूझीलंडकडून जेकब डफी, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि जेम्स निसम यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत कॅनडाच्या धावसंख्येला मर्यादा घातली.
१७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात काहीशी संथ झाली. टिम सायफर्ट आणि फिन अ‍ॅलन लवकर बाद झाले. मात्र, त्यानंतर रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे सुरेख मिश्रण करत सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या बाजूने झुकवला. रचिन रवींद्रने ३९ चेंडूंमध्ये ५९ धावांची सुसंस्कृत आणि आत्मविश्वासपूर्ण खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने अवघ्या ३६ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावांची वादळी खेळी साकारत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या दोघांच्या अविभाज्य भागीदारीमुळे न्यूझीलंडने १५.१ षटकांतच विजय निश्चित केला.
या सामन्यात अनेक उल्लेखनीय विक्रमांची नोंद झाली. युवराज सम्राने टी–२० विश्वचषक स्पर्धेत कॅनडाकडून पहिले शतक झळकावण्याचा मान पटकावला. ग्लेन फिलिप्सने विश्वचषक २०२६ मधील सर्वात जलद अर्धशतकांपैकी एक साकारत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. तसेच न्यूझीलंडने केवळ १५.१ षटकांत लक्ष्य गाठून या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात जलद यशस्वी पाठलाग नोंदवला.
या दणदणीत विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम केले असून उपांत्य फेरीकडे निर्णायक वाटचाल सुरू ठेवली आहे. कॅनडासाठी मात्र हा पराभव स्पर्धेतील आव्हान अधिक कठीण करणारा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button