देहर्जे (विक्रमगड) व विरार येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद



देहर्जे (विक्रमगड) व विरार येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पालघर, (प्रतिनिधी)दि. १४ मार्च : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान – टप्पा १’ अंतर्गत देहर्जे (ता. विक्रमगड) आणि विरार येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांमधून विविध शासकीय सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
देहर्जे येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शिबिराला उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार मयूर चव्हाण, ग्रामपंचायत सरपंच प्रसाद जाधव तसेच तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा आदी विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी शिबिरात गर्भवती महिलांना ‘बेबी किट’ चे वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्रीच्या अनुदान योजनेंतर्गत ट्रॅक्टर व पॉवर टिलरचे प्रत्येकी एक वाटप करण्यात आले.
दरम्यान, या अभियानांतर्गत विरार येथेही महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून समाजातील विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेत आहेत. शासनाच्या Single Day Service Delivery उपक्रमामुळे विविध सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.