मनोर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’; नागरिकांना विविध सेवांचे तत्काळ वितरण



मनोर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’; नागरिकांना विविध सेवांचे तत्काळ वितरण

पालघर,(प्रतिनिधी )दि. १४ मार्च : शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ अंतर्गत मनोर येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व महाविद्यालयात खासदार डॉ. हेमंत सवरा व आमदार विलास तरे यांच्या अध्यक्षतेखाली समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवांचा Single Day Service Delivery माध्यमातून नागरिकांना तत्काळ लाभ देण्यात आला. शिबिरामध्ये भूसंपादन उपजिल्हाधिकारी महेश सागर, प्रांताधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी तसेच तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरादरम्यान नागरिकांना विविध दाखले, ७/१२ उतारे, ८-अ उतारे यांचे वितरण करण्यात आले. तसेच ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजना, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांचा तात्काळ निपटारा होत असून नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व विविध लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.