जागतिक महिला दिनाच्या दिवशी ग्राहक मेळावा संपन्न….मुंबई ग्राहक पंचायत



जागतिक महिला दिनाच्या दिवशी ग्राहक मेळावा संपन्न….
मुंबई ग्राहक पंचायत
बोईसर- (प्रतिनिधी)तारापूर विभागातर्फे आयोजित वार्षिक मेळावा डॉ. होमीभाभा अणुऊर्जा सामुदायिक आणि बहुउद्देशीय भवन ग्रामपंचायत कुरगाव, ता.व जिल्हा पालघर येथे संपन्न झाला. मेळाव्याचे अध्यक्ष व मुंबई ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे खजिनदार रवींद्र सहस्रबुते उपस्थित होते. गेली 50 वर्षे मुंबई ग्राहक पंचायत ग्राहक हित लक्षात घेऊन ग्राहकांना संघटित करणे, ग्राहकांच्या दैनंदिन गरजा भागविणे, कृत्रिम टंचाई दूर करणे व बाजारपेठेतील अन्नधान्यांच्या काळाबाजार थांबवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ग्राहक, उत्पादक, व व्यापारी या सर्वांचे हित साध्य करण्यासाठी संघटित आहे. या संघटनेमध्ये 75 % टक्के महिला प्रतिनिधी, सभासद स्वयंस्फूर्तीने कार्य करीत आहेत. स्पर्धेच्या युगात ग्राहकांना बाजारपेढेत टिकाव द्यायचा असेल तर फसव्या जाहिरातींना बळी न पडता जे योग्य आहे ते स्वीकारायला हवे.
प्रमुख पाहुणे बोईसर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व अध्यक्ष डॉ. नंदकुमार वर्तक यांनी कुटुंबातील तसेच ग्राहक पंचायतीतील नातेसंबंधावर भाष्य केले. ‘ वसुधेव कुटुम्बकमं ‘ समूहातील सर्वांच्या एकत्रित सहकार्यावर यश अवलंबून असते. ग्राहक पंचायतीने जोडलेली माणसे टिकवून नवीन माणसे जोडली पाहिजेत. आपण सर्व सेवकच आहोत. कामाचे वितरण करून जबाबदाऱ्या सांभाळल्या तर मोठे काम होते; हे मुंबई ग्राहक पंचायतीने दाखवून दिले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. लीना वर्तक यांनी महिलांचे आरोग्यावर मार्गदर्शन करताना महिलांनी सकस व सात्विक अन्न सेवन केले पाहिजे. आपले मन आनंदी ठेवून कार्य केले तर कोणताही आजार संभवत नाही. ग्राहक पंचायतीमध्ये माझ्या सर्व भगिनी कुटुंबाची मोठी जबाबदारी सांभाळून ग्राहक चळवळीचे काम करीत आहेत. पालघर वितरण केंद्राचे कार्याध्यक्ष दीपक भंडारी यांनी या सामूहिक कार्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून संघटनात्मक कार्य वाढवणे गरजेचे आहे. सभासद व संघ वाढीवर भर दिला पाहिजे. मेळाव्याला ग्राहक संघातील संघप्रमुख तसेच प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते; यात महिलांचा सहभाग जास्त होता. दुसऱ्या सत्रात अविनाश राऊत यांचा कराओके गाण्याचा कार्यक्रम झाला.
मेळाव्याला कुरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदयन सावे, अजित राणे, विजय झोपे, वर्षा जगदाळे, अमिता पाटील, स्नेहल वर्तक, उपस्थित होत्या.
बोरवली विभागाचे कार्याध्यक्ष राजेंद्र राणे, नीता जांभेकर, मनीषा पुराणिक, पालघर विभाग व वितरण केंद्रातून मधुसूदन जोशी, विनय पाटील, सुनंदा तोडणकर, संदेश चुरी, उल्हास चौधरी, वनिता महाडिक उपस्थित होत्या. मेळाव्याचे प्रास्ताविक बोईसर तारापूर विभागाच्या कार्याध्यक्षा माधुरी वर्तक, अहवाल वाचन व आभार प्रदर्शन कार्यवाह वैशाली पारवेकर, खजिनदार प्रा. संजय घरत यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमास वेगळीच उंची गाठली.