Uncategorized

भूमि अभिलेख कर्मचारी कृती समितीचा प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

भूमि अभिलेख कर्मचारी कृती समितीचा प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा
मुंबई,(प्रतिनिधी) दि. ०३ फेब्रुवारी २०२६ — भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांनी भूमि अभिलेख विभागातील प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारला निवेदन सादर करत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. समितीने मुख्यमंत्री, महसूल मंत्री, मुख्य सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संघटनेकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ नागपूर येथील प्रकरण क्रमांक ४२६/२०१९ संदर्भातील आदेशाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
तसेच महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊनही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे शासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
समितीच्या मते, विभाग व शासन स्तरावर केवळ वेळकाढूपणा केला जात असून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे न्याय मिळत नसल्याची भावना तीव्र झाल्याने राज्यभरातील भूमि अभिलेख कर्मचारी कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button