पालघर येथील एस.डी.एस.एम. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.


विद्यार्थ्यांच्या कला गुणांनी सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली.
पालघर येथील एस.डी.एस.एम. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
पालघर (वार्ताहर) : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी संचलित पालघर जिल्ह्यातील नामांकित एस.डी.एस.एम. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘क्षितिज’ मंगळवार, दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता उत्साहपूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाट्य, एकांकिका तसेच विविध सांस्कृतिक कला सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचा शुभारंभ सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी. ए. सचिन कोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी तसेच महाविद्यालयाच्या मालमत्तेचे संरक्षण करावे असे आवाहन केले. अनावश्यक तोडफोडीचा आर्थिक भार शेवटी विद्यार्थ्यांनाच सहन करावा लागतो, असे श्री. कोरे यांनी नमूद केले. स्नेहसंमेलना सारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देतात व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात, असेही अध्यक्ष श्री.कोरे यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की वार्षिक स्नेहसंमेलन हा क्षण विद्यार्थी वर्षभर उत्सुकतेने प्रतीक्षा करत असतात. हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक जीवनातील अविस्मरणीय अनुभव ठरतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.दिलीप तेलमोरे यांनी केले. त्यांनी स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.या प्रसंगी पर्यवेक्षक प्रा. सुरेश हजबे, डॉ. धिरज राऊत, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ व डॉ. महेश देशमुख, पर्यवेक्षक डॉ. हर्षद वनमाळी व डॉ. शैलजा पालन उपस्थित होते. वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रा. राजू तांडेल व डॉ. शैलजा पालन, तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपकार्याध्यक्ष प्रा. श्री. वसावे, प्राध्यापिका दीप्ती भोयर व प्राध्यापिका अनिता लोहार यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले. यावेळी चित्रकलेचा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुप्रिया राऊत यांनी अत्यंत प्रभावी व ओघवत्या शैलीत केले.कृीडा व संस्कार्तिक मंडळाचे कार्यअध्यक्ष पंढरीनाथ घोडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले.