दापचरी केंद्राच्या विविध गुणदर्शन स्पर्धा जि. प. घाडणे येथे संपन्न





दापचरी केंद्राच्या विविध गुणदर्शन स्पर्धा जि. प. घाडणे येथे संपन्न
डहाणू दि.२४ (प्रतिनिधी)
बालमनातील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने, दापचरी केंद्रीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच जि. प. घाडणे येथे अत्यंत उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख मा. सुरेश चौधरी सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा. करबट साहेब आणि घाडणे ग्रामपंचायतीच्या सरपंच करबट मॅडम, मुख्याध्यापक घरत सर यांची विशेष उपस्थिती होती.या सोहळ्याने दापचरी केंद्रातील विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराची एक नवी उंची गाठली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यादेवता सरस्वती आणि स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले.स्पर्धेचे नि:पक्षपाती परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून डॉ. दत्तात्रय शिंदे सर (शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर, वरखंडा), प्राचार्य तुवर सर (विनायकराव पाटील कॉलेज),श्री.वरठा सर(जि. प. शाळा, तोरणीपाडा) या तज्ज्ञांनी चोख जबाबदारी पार पाडली.दुपारच्या सत्रात डहाणू पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ. ममता पटेल मॅडम यांनी स्पर्धेला भेट दिली. “स्पर्धेत जय-पराजयापेक्षा सहभाग महत्त्वाचा असून, अशा व्यासपीठामुळेच भविष्यातील कलाकार घडतात,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.दिवसभर चाललेल्या विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणानंतर विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बक्षीस स्वीकारतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.परीक्षक डॉ. शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेत जाणवलेल्या उणीवा कमतरता भरून काढत पुढील स्पर्धेसाठी अधिक जोमाने तयारी करा असा संदेश दिला. आयोजक जि. प. शाळा घाडणे व शिवपाडा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश जनाथे व दिलीप धांगडा यांनी केले. तर आभार प्रदर्शन गोंधळी सर यांनी व्यक्त केले.