मायखोप गावातील होळी उत्सव नवीन उपक्रमात साजरी होणार

मायखोप गावातील होळी उत्सव नवीन उपक्रमात साजरी होणार
केळवारोड, (प्रतिनिधी)दि. 24 — फाल्गुन महिन्यात येणारा होळी हा हिंदू धर्मातील हर्षोल्हास वाढविणारा सण असून महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पालघर जिल्ह्यातील आगरी समाजात हा उत्सव विशेष आनंदात, एकोप्याने आणि सामूहिक सहभागातून साजरा करण्याची परंपरा आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक होळी असतेच, शिवाय हल्ली पाड्यापाड्यांवरही होळीका दहनाचे आयोजन केले जाते.
मायखोप गावातील समाजसेवक रामदास पाटील यांनी यंदा होळी उत्सवात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. सर्वसामान्यांसाठी असामान्य ठरणारी ही होळी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे येणारा कुणीही उपाशीपोटी जाऊ नये यासाठी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते.
दि. २ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या होळी उत्सवात यंदा “साहित्य कवीकट्टा” हा नवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक रामदास पाटील यांनी दिली. या उपक्रमाची संकल्पना आगरी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील (मायखोपकर) यांची आहे.
करुणा रामदास पाटील (माजी सरपंच), स्नेहा पाटील, दत्तात्रेय भोईर, निलेश पाटील, कलाकार भोईर, अक्षय भोईर, कैलास पाटील, दशारथ घरत, जालिंदर पाटील आदींसह समस्त कार्यकारी मंडळ हा उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहे.
समाजातील रूढी-परंपरा जपण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, आगरी समाजातील लग्नसमारंभात जशा धवलारिणी पारंपरिक गीते सादर करतात, त्याच धर्तीवर होळीगीत व कवितांचे सादरीकरण करणारा छोटेखानी कवीकट्टा होळीच्या रात्री आयोजित करण्यात आला आहे. सहभागी धवलारिणींचा गौरव करण्यात येणार असून गावातील लेखक व कवी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
या उत्सवाला परिसरातील आगरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.