Uncategorized

मराठी भाषा गौरव दिनी दादर ठरणार साहित्य-संस्कृतीचा साक्षीदार; सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक स्पर्धेचा मानाचा पुरस्कार सोहळा

मराठी भाषा गौरव दिनी दादर ठरणार साहित्य-संस्कृतीचा साक्षीदार; सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक स्पर्धेचा मानाचा पुरस्कार सोहळा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादर-पश्चिम येथील धुरू हॉल, छबिलदास रोड येथे मराठी भाषा गौरव दिन आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा बहुआयामी सोहळा पार पडणार आहे. याच वेळी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही होणार आहे. दिवंगत कामगारनेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मराठी विचारधारा प्रतिष्ठानच्या वतीने “वैभवशाली मराठी भाषेचे गद्दार कोण?” या विषयावरील राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही पार पडणार आहे. भाषा, साहित्य, पत्रकारिता आणि विचारपरंपरेचा संगम घडवणारा हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आयोजित दिवाळी अंक स्पर्धेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून, महाराष्ट्रात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या या स्पर्धेला सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभले आहे. गेली ५० वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या अक्षरयज्ञाने दिवाळी अंक परंपरेला बळ दिले आहे. ११७ वर्षांच्या दिवाळी अंक परंपरेत सातत्य राखत गुणवत्तापूर्ण अंक प्रकाशित करणाऱ्या संपादकांना “सुवर्णमुद्रा दिवाळी अंक परंपरेची” हा विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्यांसाठी दिवंगत दत्ता कामथे स्मृती “ग्रंथसखा सन्मान पुरस्कार” प्रदान केला जाणार आहे. यंदा मनमाड येथील शिक्षक अनिल शिनकर यांची निवड करण्यात आली आहे. शिनकर यांनी स्वखर्चाने १३५० प्रकाशनांचे ३५०० हून अधिक दिवाळी अंक संग्रही जतन केले असून त्यांच्या या अभ्यासपूर्ण जतनकार्याचा गौरव या मंचावर होणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संजय घाडी (उपमहापौर, मुंबई), मा. श्री. अशोक पाटील (उद्योजक) आणि मा. श्री. संजय धुमाळ (पोलीस सहाय्यक आयुक्त) उपस्थित राहणार आहेत.

विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून मा. श्री. अशोक कोठावळे (संपादक, दीपावली/ललित), मा. श्री. अरुण शेवते (संपादक, ऋतुरंग) आणि मा. श्रीमती नीलिमा कुलकर्णी (संपादक, धनंजय/चंद्रकांत) उपस्थित राहतील. रवींद्र मालुसरे (अध्यक्ष), श्रीमती शुभा द. कामथे (प्रमुख कार्यवाह), विकास होशिंग, ॲड. देवदत्त लाड, संजीव गुप्ते, प्रशांत घाडीगावकर (प्रमुख कार्यवाह), रमेश सांगळे (कार्याध्यक्ष), आत्माराम गायकवाड (कोषाध्यक्ष), नितीन कदम (कार्यवाह) व कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.

मराठी भाषेचा स्वाभिमान, साहित्य परंपरेचे सातत्य आणि विचारस्वातंत्र्याची निष्ठा यांचा एकत्रित उत्सव म्हणून दादरचा हा मंच पुन्हा एकदा इतिहास साक्षी ठेवणार आहे. सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक परंपरेचा गौरव आणि भाषिक अस्मितेची अभिव्यक्ती एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची ही दुर्मीळ संधी ठरणार असून, मराठी संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला नव्या पिढीसमोर दृढपणे उभे करणारा हा सोहळा प्रेरणेचा नवा अध्याय लिहिणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button