Uncategorized

ज्ञानमाता आश्रम शाळा झरी येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

ज्ञानमाता आश्रम शाळा झरी येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा


​तलासरी (प्रतिनिधी )दि. २७

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा ‘मराठी भाषा गौरव दिन’ ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय, झरी येथे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
​कार्यक्रमाच्या सत्रात सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या सि. बस्तियान फर्नांडिस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई येथील ‘आशा सेंटर फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ संस्थेमार्फत त्यांना ‘उत्कृष्ट मुख्याध्यापिका’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्याबद्दल ‘वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाच्या’ वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
​कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रेमंड मच्याडो यांनी विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखनाचे महत्त्व पटवून दिले. “वाचन केल्याने विचार प्रगल्भ होतात,” असे सांगत त्यांनी प्रभावी लेखनासाठी आवश्यक टिप्स दिल्या. तर सचिव श्री. लेस्ली डिसिल्वा यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा प्रवास आणि मराठी साहित्याची समृद्धी यावर प्रकाश टाकला.

​डॉ. दत्तात्रय शिंदे यांची काव्यमय फटकेबाजी

​दुपारच्या सत्रात मराठी भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या विनोदी शैलीने कार्यक्रमात रंगत भरली. त्यांनी मराठी बोलीभाषेतील गंमती-जमती सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी मराठी भाषेचा उगम, विस्तार,महत्व तसेच रोजच्या व्यवहारातील इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द,गंमतीदार मराठी उखाणे सादर केले.
त्यांच्या विशेष शैलीतील काव्याने उपस्थितांची मने जिंकली.
​”आपली आश्रम शाळा झरी आहे ज्ञानमातेची पंढरी
इथली हुशार पोरं अन पोरी शिक्षक आहेत लय भारी
सिस्टर बस्तियान एक नंबरी पुरस्कार घेतात वरचेवरी
दत्ता म्हणे गोष्ट ही खरी टाळ्या होऊ द्या शंबर नंबरी”

​अशा शब्दांत त्यांनी शाळेच्या शिस्तीचे आणि प्रगतीचे कौतुक केले. शाळेतर्फे डॉ. दत्तात्रय शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी ​मराठी भाषेचा अभिमान जागवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात मराठी भाषा गौरव गीत आणि समूह गायन,महाराष्ट्राची लोककला असलेली लावणी,बळीराजाच्या कष्टाचे दर्शन घडवणारे शेतकरी नृत्य आदींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी मराठी संस्कृतीचा वारसा अधिक ठळकपणे समोर आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित मालकरी सर , दिलीप राबड सर यांनी तर आभार सुशीला कांटेला मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button