Uncategorized

खासदार डॉ.हेमंत सवरा यांच्या ‘जनता दरबारात’ भूमिपुत्रांच्या प्रश्नांचा एल्गार!

खासदार डॉ.हेमंत सवरा यांच्या ‘जनता दरबारात’ भूमिपुत्रांच्या प्रश्नांचा एल्गार!

डहाणू/प्रसाद भालेराव
पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी दिनांक २७ रोजी,तलासरी येथे आयोजित केलेल्या ‘जनता दरबारात’ भूमिपुत्र एल्गार संघटनेने स्थानिक समस्यांबाबत निवेदन देत सनदशीर पाऊल उचलले. यावेळी संघटनेने १० वर्षे सेवा देणाऱ्या आदिवासी रुग्णवाहिका चालकावरील अन्याय आणि डहाणूतील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या लुटीबाबत सविस्तर निवेदन देऊन खासदारांचे लक्ष वेधले. खासदार सवरा यांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

१० वर्षे सेवा देणाऱ्या आदिवासी चालकावर अन्याय; सेवेत पुन्हा घेण्याची मागणी
तलासरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वसा येथे गेल्या १० वर्षांपासून (२०१४ ते २०२५) प्रामाणिकपणे रुग्णवाहिका चालक म्हणून सेवा देणाऱ्या संपत लहान्या डावरे या आदिवासी तरुणाला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामावरून कमी करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या २०२४ च्या कंत्राटी कर्मचारी समायोजन धोरणानुसार १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणे अपेक्षित असतानाही हा अन्याय झाला आहे. “एका निष्ठावान भूमिपुत्राला अशा प्रकारे बेरोजगार करणे अन्यायकारक आहे,” अशी भूमिका संघटनेचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील वाघ यांनी मांडली.

डहाणूतील शेतकऱ्यांची माती आणि जमिनीची लूट,
यावेळी डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांनीही जोर धरला.

१. माती उत्खनन; अनेक कंत्राटदारांनी शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता त्यांच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन केले आहे.

२. संजान-सायवन महामार्ग; या महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, परंतु त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासन भूसंपादनाचे अधिकृत तपशील दाखवण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

खासदारांचा सकारात्मक प्रतिसाद आणि निर्देश-
निवेदनातील गांभीर्य ओळखून खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी सकारात्मक चर्चा केली. त्यांनी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संपत डावरे यांच्या पुनर्नियुक्तीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच, डहाणूतील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि माती उत्खनन प्रकरणात पारदर्शकता आणून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील वाघ, तलासरी तालुका अध्यक्ष अनिल करबट, तालुका सचिव सुनीता वळवी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

“आमच्या भागातील भूमिपुत्रांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. खासदारांनी दिलेला शब्द आणि त्यांनी दिलेले निर्देश यामुळे आम्हाला न्यायाची पूर्ण खात्री आहे.”
स्वप्नील वाघ. (जिल्हा सरचिटणीस, भूमिपुत्र एल्गार संघटना)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button