बोईसर एमआयडीसीत ओलियम वायूची गळती; प्रशासन सतर्क, नागरिकांना सावधतेचे आवाहन

बोईसर एमआयडीसीत ओलियम वायूची गळती; प्रशासन सतर्क, नागरिकांना सावधतेचे आवाहन
पालघर, (प्रतिनिधी)दि. — बोईसर एमआयडीसी, तारापूर येथील Bhageria Industries Limited या कारखान्यातील साठवण टाकीतून ओलियम (Oleum) वायूची गळती झाल्याची घटना समोर आली आहे. गळतीमुळे परिसरातील वातावरणात काही ठिकाणी पांढऱ्या धुरासारखे किंवा धुक्यासारखे दृश्य दिसत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच कंपनीचे प्रतिनिधी, आपत्कालीन यंत्रणा आणि संबंधित प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक माधव तोटेवाड यांनी जनहितार्थ जारी केलेल्या सूचनेनुसार, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांनी घरातच थांबावे व सर्व दरवाजे-खिडक्या बंद ठेवाव्यात. पंखे, एसी आणि इतर वायुवीजन यंत्रणा तात्पुरती बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अत्यावश्यक कारणास्तव बाहेर पडावे लागल्यास नाक व तोंड ओल्या कापडाने झाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कारखान्याजवळ गर्दी करू नये किंवा अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रशासनाकडून पुढील माहिती वेळोवेळी जाहीर केली जाणार असून नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.