भूमिपुत्र एल्गारचा हुंकार!’लाडकी बहीण’ आता रस्त्यावर उतरणार;प्रशासनाच्या ‘अन्यायकारक निर्णयाची’ होणार धुलाई!
भूमिपुत्र एल्गारचा हुंकार!
‘लाडकी बहीण’ आता रस्त्यावर उतरणार;प्रशासनाच्या ‘अन्यायकारक निर्णयाची’ होणार धुलाई!
•२० वर्षांच्या सेवेनंतर ६० महिलांना डच्चू;
•९ मार्चला बादल्या, साबण अन् ब्रश घेऊन धुलाई आंदोलन!*
जव्हार/प्रसाद भालेराव
एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेचा उदो-उदो होत असताना, जव्हारमधील ६० गरीब आदिवासी महिलांना २० वर्षांच्या सेवेनंतर बेरोजगार करून प्रशासनाने रस्त्यावर आणले आहे. या अन्यायाविरोधात ‘भूमिपुत्र एल्गार’ संघटनेने आता आक्रमक लढाई पुकारली असून, येत्या ९ मार्च २०२६ रोजी जव्हार प्रकल्प कार्यालयासमोर प्रशासनाच्या “अन्यायकारक निर्णयाची धुलाई” करण्याचे अनोखे आंदोलन पुकारले आहे. वर्ग चार कर्मचारी म्हणून सातत्यपूर्ण काम असताना २०-२० वर्षे या महिलाना कंत्राटी म्हणून राबवून घेतले आहे.
•प्रमोद पवार यांनी प्रशासनाला दिला होता इशारा!
भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन २० जानेवारी २०२६ रोजी प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर (IAS) यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. “२० वर्षे प्रामाणिक सेवा देणाऱ्या स्थानिक भूमिपुत्र महिलांचा घास हिरावून बाह्य यंत्रणेला (Outsourcing) पोसण्याचे काम प्रशासन करत आहे. जर या महिलांना न्याय मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा पवार यांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
•काय आहे ‘धुलाई आंदोलन’?
हे आंदोलन केवळ घोषणाबाजीपुरते मर्यादित नसेल. ६० महिला कर्मचारी आपल्यासोबत बादल्या, कपडे, साबण आणि ब्रश घेऊन येतील आणि प्रकल्प कार्यालयाच्या उंबरठ्यावरच प्रत्यक्ष कपडे धुवून प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध नोंदवतील. “आमचे काम हिरावले, तर आम्ही आमचे कसब तुमच्या दारातच दाखवू,” अशी भूमिका या महिलांनी घेतली आहे.
या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन:
या आंदोलनाचे नियोजन आणि नेतृत्व भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम राज्य शक्ती प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील वाघ, मोखाडा तालुका अध्यक्ष गणेश माळी आणि मोखाडा तालुका कार्याध्यक्ष रामा होला यांच्या समवेत सर्व अन्यायग्रस्त महिला करणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रकल्प कार्यालय आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.