कोकण सरस 2026 : विरार येथे महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा


कोकण सरस 2026 : विरार येथे महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा
पालघर,(प्रतिनिधी) दि. ५ मार्च
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद पालघर आणि वसई विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “कोकण सरस 2026” अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा म्हाडा मैदान (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), जकात नाका, विरार पश्चिम येथे दि. १२ ते १६ मार्च २०२६ दरम्यान दररोज सकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत भरविण्यात येणार आहे.
ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाचा आणि कौशल्याचा उत्सव ठरणाऱ्या या मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ, घरगुती मसाले, पारंपरिक ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. महिलांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
खवय्यांसाठी खास मेजवानीही सज्ज असणार आहे. कोकणातील सिंधुदुर्गपासून ते मोखाड्यापर्यंतच्या पारंपरिक चवींचा आस्वाद येथे घेता येणार आहे. पुरणपोळी, उकडीचे मोदक, घावणे, रस शिरवाळे, कोंबडी-वडे, नाचणीच्या भाकरी तसेच ताज्या समुद्री खाद्यपदार्थांची रेलचेल नागरिकांना अनुभवता येणार आहे.
कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील स्वयंसहायता समूहांचा सहभाग राहणार असून हस्तकला, प्रक्रिया उद्योग व खाद्यपदार्थांचे एकूण १५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष व आरोग्य कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांच्या नियोजनातून राबविण्यात येत आहे. तसेच वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दीपक सावंत यांच्या सहकार्याने हा मेळावा पार पडणार आहे.
कोकण स्तरावरील या सरस मेळाव्यामुळे महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार असून दीर्घकालीन ग्राहकवर्ग निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
दि. १२ ते १६ मार्च २०२६ दरम्यान विरार येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची खरेदी करावी व कोकणच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.