निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
सफाळे (प्रतिनिधी): येथील कै. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेच्या निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीचा निरोप समारंभ मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टरेट पदवीधारक लेखक, कवी, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री. धर्माजी खरात हे उपस्थित होते. इयत्ता १२ वी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद करत खरात सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी लेखू नये, स्वतः प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही, नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, इतरांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतःची ओळख निर्माण करा, भूतकाळाकडे पाहण्यापेक्षा आपण कसा इतिहास घडवू शकतो यावर लक्ष केंद्रित करा, सोशल मीडियाचा विनाकारण वापर टाळून इंटरनेटचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी करा, चांगल्या मित्रांची निवड करा आणि वाईट संगतीपासून दूर राहा, असे महत्त्वाचे सल्ले त्यांनी दिले.
तसेच एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम, करिअरच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व तसेच शिक्षणादरम्यान शासनाकडून मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्त्यांची सविस्तर माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
अध्यक्षीय भाषणात उषा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर एकाग्र राहून भविष्यात मोठे यश मिळवावे, असे सांगत इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्रमुख दाते व माजी मुख्याध्यापक राजन घरत यांनीही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी इयत्ता १२ वीच्या सहा विद्यार्थ्यांनी आपल्या दोन वर्षांच्या महाविद्यालयीन प्रवासातील आठवणींना उजाळा देत, स्वतःमध्ये झालेले बदल व शिक्षकांप्रती असलेला आदर भाषणातून व्यक्त केला.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या मधुमती कुलकर्णी, उपप्राचार्या सुजाता घरत, पर्यवेक्षक राजेंद्र जायभाये, संस्थेच्या उपाध्यक्षा गीता पागी, संस्था प्रशासक नामदेव कुडू आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या मधुमती कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राजेंद्र जायभाये सरांनी तर अध्यक्षांचा परिचय सुजाता घरत मॅडम यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. हेमंत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मनीषा वैती यांनी केले.