पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न.

पा यूलकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न


पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ६७४ कोटींच्या आराखड्यास मंजुरी
पालघर (प्रतिनिधी)दि.४फेब्रुवारी : पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला गती देणारी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात पार पडली.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी विकास, पर्यटन, सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस सर्वश्री आमदार ॲड. निरंजन डावखरे , ज्ञानेश्वर म्हात्रे राजेंद्र गावीत , शांताराम मोरे , विलास तरे , हरिश्चंद्र भोये , स्नेहा दुबे- पंडित , राजन नाईक जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़, वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधिक्षक, यतिश देशमुख, प्रकल्प अधिकारी डहाणू विशाल खत्री,जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली झालेल्या अपघाती निधनाबद्दल जिल्हा नियोजन समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
२०२६–२७ साठी ६७४ कोटींच्या आराखड्यास मान्यता
सन २०२६–२७ साठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी रु. ४१०.४३ कोटी, सर्वसाधारण योजनेसाठी रु. २४९.७४ कोटी आणि विशेष घटक योजनेसाठी रु. १४ कोटी अशी एकूण रु. ६७४.१७ कोटींची मर्यादा शासनाने निश्चित केली आहे. या निधीच्या चौकटीत सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने एकमताने मंजुरी दिली. तसेच सर्वसाधारण व आदिवासी घटक योजनेसाठी अनुक्रमे रु. ३३३.५० कोटी व रु. १०० कोटींच्या अतिरिक्त निधी मागणीस शासनाकडे सादर करण्यासही मान्यता देण्यात आली.
मागील योजनांच्या कामांना प्राधान्य
सन २०२५–२६ अंतर्गत ७९९.४३ कोटींच्या निधीपैकी जानेवारी २०२६ अखेर ५५९.५६ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली असून २७०.३६ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या कामांच्या उर्वरित दायित्वास प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.
पर्यटन विकासासाठी NKCCA सोबत सामंजस्य करार
पालघर जिल्ह्याला सांस्कृतिक आणि इको-टुरिझमचे नवे केंद्र म्हणून उभारण्यासाठी North Konkan Chamber of Commerce & Agriculture (NKCCA) सोबत सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत युवकांसाठी रील स्पर्धा, डिजिटल कथन, जनजागृती मोहिमा व दर्जेदार पर्यटन माहिती साहित्य निर्मिती केली जाणार आहे. या करारामुळे स्थानिक उपजीविका, नवकल्पना आणि लोकसहभागाला चालना मिळणार आहे.
बिरसा मुंडा स्मारकास मंजुरी
स्वातंत्र्यलढ्यातील महान आदिवासी क्रांतीकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या उभारणीस पालघर येथे सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या स्मारकातून त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याबरोबरच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा गौरव
पालघर जिल्ह्याचे भूषण असलेल्या ज्येष्ठ तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा जिल्हा नियोजन समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
‘क’ वर्ग दर्जा प्राप्त तीन तीर्थक्षेत्रे
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपुर्णता अभियान २.० चा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीकृष्ण मंदिर (गालतरे, वाडा), पद्मनाभ स्वामी मंदिर (टेंभोडे, पालघर) आणि शीतलादेवी मंदिर (केळवे, पालघर) या तीन यात्रास्थळांना ‘क’ वर्ग दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.