पालघर जिल्ह्याच्या दशरथ संखे यांची जागतिक सीनियर क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी; ‘टॉप विकेट टेकर’ किताब पटकावला

पालघर जिल्ह्याच्या दशरथ संखे यांची जागतिक सीनियर क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी; ‘टॉप विकेट टेकर’ किताब पटकावला
पालघर : (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यातील बोईसर वंजारवाडा येथील वंजारी समाजातील नामांकित क्रिकेटपटू व अमेरिकन सीनियर क्रिकेट संघाचे कर्णधार दशरथ दामोदर संखे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार कामगिरी करत जागतिक सीनियर क्रिकेट स्पर्धेत “टॉप विकेट टेकर” हा मानाचा किताब मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे पालघर जिल्ह्यासह वंजारी समाजाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
न्यूझीलंड येथे १७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या जागतिक सीनियर क्रिकेट स्पर्धेत अमेरिकन सीनियर क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना कर्णधार दशरथ संखे यांनी संपूर्ण स्पर्धेत प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
२२ फेब्रुवारी रोजी रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी पहिल्या चार षटकांत चार विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. या शानदार प्रदर्शनाबद्दल त्यांना “मॅन ऑफ द मॅच” पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या अखेरीस ५ मार्च २०२६ रोजी संपूर्ण टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत “टॉप विकेट टेकर” हा प्रतिष्ठेचा किताब मिळवत त्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. त्यांच्या या कामगिरीमुळे जागतिक क्रिकेट विश्वात वंजारी समाजाचे नाव अभिमानाने उजळले आहे.
दशरथ संखे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
तारापूर लेबर युनियनचे अध्यक्ष, कै. हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसरचे अध्यक्ष तसेच स्थानिक जनविकास प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि बोईसर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रविण संखे यांनी संपूर्ण वंजारी समाजातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दशरथ संखे यांच्या या यशामुळे पालघर जिल्ह्यासह बोईसर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे.