नालासोपारा येथे बार्टी आणि एम.सी.ई.डी.मार्फत मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्नउद्योजक होऊन स्वतःचे मालक व्हा आणि बेरोजगार लोकांना काम द्या– धम्मपाल थोरात –प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. पालघर




नालासोपारा येथे बार्टी आणि एम.सी.ई.डी.मार्फत मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न
उद्योजक होऊन स्वतःचे मालक व्हा आणि बेरोजगार लोकांना काम द्या– धम्मपाल थोरात –प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. पालघर
प्रतिनीधी- पालघर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे आणि उद्योग संचालनालय- महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील युवक-युवतींना आणि महिला पुरूषांना उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी काल दिनांक २० डिसेंबर २०२५ शनिवार रोजी के .एम. व्होकशनल ट्रेनिंग सेंटर, नालासोपारा पूर्व ता.वसई येथे एक महिना कालावधीचे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
पालघर जिल्ह्यातील बार्टी द्वारे स्थापित स्वयंसहायता गटातील अनुसूचित जातीमधील युवक-युवती आणि महिला पुरुष यांच्यासाठी एक महिना कालावधीचा मोफत अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि.२० डिसेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत के.एम. व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर नालासोपारा पूर्व येथे आयोजित केला आहे. एकूण ३० पात्र लाभार्थी मुलाखती मार्फत निवडले असून त्यांना येथे एक महिना सदरील ट्रेनिंग मोफत दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणात विविध उद्योगातील उद्योग संधी, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा,यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक सर्वंकष मार्गदर्शन,उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, बाजारपेठ व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल कसा तयार करावा यासह उद्योग उभारणीसाठीच्या विविध विषयांचा समावेश असेल.यामुळे पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील युवक आणि युवतीना मोफत दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना विविध महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ देऊन पुढे एक ते दोन वर्ष एम. सी.ई.डी.मार्फत उद्योग उभारणीसाठी त्यांचा मोफत पाठपुरावा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारोह प्रसंगी बोलतात श्री. धम्मपाल थोरात–एम.सी.ई.डी. प्रकल्प अधिकारी पालघर म्हणाले –एक महिना कालावधीचे हे प्रशिक्षण घेऊन उद्योग उभारा आणि उद्योजक होऊन स्वतःचे मालक बना. त्यानंतर आपल्या आजुबाजूच्या सुशिक्षित बेरोजगार यांनाही आपल्या उद्योगात काम द्या.श्री.अजय भगत –ट्रेनर व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर यांनी आलेल्या संधीचा लाभ घेऊन उद्योग सुरू करा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या. डॉ.दिनेश गुप्ता –ईडीपी ट्रेनर यांनी उद्योजकीय मानसिकता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बार्टी मधील विविध योजनांची माहिती सांगून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंजना देवकांत –समतादूत बार्टी पालघर यांनी केले.
यावेळी श्रीमती जयश्री चौधरी –समतादूत बार्टी, श्री. प्रमोद दुबे–अध्यक्ष पीपल्स सेवा चॅरिटेबल ट्रस्ट वसई, श्रीमती वैशाली ढेपे –प्रशिक्षण समन्वयक एम.सी.ई.डी. पालघर आदी मान्यवर उपस्थित होते.