Uncategorized

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पालघरमध्ये जनजागृती; TB मुक्त भारत अभियान २.० ला सुरुवात

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पालघरमध्ये जनजागृती; TB मुक्त भारत अभियान २.० ला सुरुवात
पालघर | २४ मार्च
जिल्हा परिषद पालघरच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात TB मुक्त भारत अभियान २.० ची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सुरळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तन्वीर शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने झाली. सूर्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे क्षयरोगाविषयीचे गैरसमज दूर करत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. कांचन गृह उद्योग व हर्षी इंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना पोषणयुक्त फूड बास्केटचे वितरण करण्यात आले. तसेच उपचार पूर्ण करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या टीबी चॅम्पियन्सचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी लवकर निदान, नियमित उपचार आणि सामूहिक जबाबदारी या त्रिसूत्रीवर भर देत “क्षयरोगमुक्त भारत” साकारण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राचे समन्वयक मनोज सर, PPSA जिल्हा कॉर्डिनेटर विशाल सर व त्यांची टीम, तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व STS/STLS यांनी मोलाचे योगदान दिले.
जागतिक क्षयरोग दिन : इतिहास
२४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला. त्या स्मरणार्थ दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
क्षयरोगाची लक्षणे ओळखा
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला
संध्याकाळी ताप व रात्री घाम येणे
वजन घटणे, भूक कमी होणे
थुंकीत रक्त किंवा छातीत वेदना
सतत थकवा
तपासणी व उपचार मोफत
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये खालील सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत:
थुंकी तपासणी
CB-NAAT / TruNat चाचणी
छातीचा एक्स-रे
“वेळेत तपासणी आणि पूर्ण उपचार केल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्षयरोगमुक्त भारतासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.”
— जिल्हा क्षयरोग केंद्र, पालघर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button