Uncategorized

बारावी परीक्षा : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांची सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात भेटकॉपीमुक्त अभियानाची प्रत्यक्ष पाहणी

बारावी परीक्षा : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांची सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात भेट
कॉपीमुक्त अभियानाची प्रत्यक्ष पाहणी
पालघर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी आज सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापन, पर्यवेक्षण, शिस्त तसेच सुरक्षा उपाययोजनांची सखोल तपासणी केली. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत परीक्षा पारदर्शक, शांत व भयमुक्त वातावरणात सुरू असल्याची खात्री करून घेतली.
यावेळी त्यांनी परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची उपस्थिती, गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या, उपस्थिती नोंदवही तसेच केंद्रस्तरीय यंत्रणेच्या कामकाजाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉपीमुक्त, शिस्तबद्ध व शांत वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व परीक्षा केंद्र प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button