राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा




राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
वाणगाव, ता. डहाणू (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पद्मश्री जिव्या सोमा म्हशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव येथे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी कार्यक्रमाची थीम “Women in Science: Catalyzing Viksit Bharat” अशी ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आर. यू. उगले (माजी प्राचार्य, जे.एम.टी. हायस्कूल, वाणगाव) उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. संजय भोई यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व विज्ञान दिनाच्या महत्त्वावरील प्रास्ताविकाने झाली. प्रभारी प्राचार्य श्री. चंदन बंजारा यांनी प्रस्तावना सादर केली. यावेळी श्रीमती कल्याणी तळपाडे यांनी विज्ञानातील महिलांचे योगदान, नवोन्मेष आणि विकसित भारताच्या निर्मितीत विज्ञानाची भूमिका यावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चैताली आहेर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीमती सुप्रिया चुरी यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून विज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.