कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला भावपूर्ण निरोप : रवींद्र शिंदे यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात संपन्न


कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला भावपूर्ण निरोप : रवींद्र शिंदे यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात संपन्न

जिल्हा परिषद पालघर | दि. ३१ मार्च २०२६
पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभ काल (दि. ३० मार्च) जननायक बिरसा मुंडा सभागृहात उत्साहपूर्ण तसेच भावनिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, भावना विचारे, हबीब शेख यांच्यासह शिंदे यांचे कुटुंबीय व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात कपिल पाटील यांच्या हस्ते रवींद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख कार्यशैलीचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रशासनात ठाम निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांप्रती असलेली संवेदनशीलता यांचा उत्तम समन्वय त्यांनी साधला, असे गौरवोद्गार काढण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शिंदे यांच्यासोबतचे अनुभव मांडत त्यांच्या कामावरील निष्ठा, निर्णयक्षमता आणि मानवी दृष्टिकोनाचे कौतुक केले. “शिस्त आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधणारा अधिकारी म्हणून शिंदे यांची ओळख कायम राहील,” असे त्यांनी नमूद केले.
तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनीही त्यांच्या कार्यशैलीचा गौरव करत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याच्या त्यांच्या क्षमतेचे विशेष कौतुक केले.
आपल्या भाषणात रवींद्र शिंदे यांनी सेवाकाळातील अनुभव, आव्हाने आणि त्यावरील मात यांचा आढावा घेत प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी यांना दिलेले प्राधान्य अधोरेखित केले. सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच अनेक उपक्रम यशस्वी झाले, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्या यशामागे आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. मुलगा तन्मय शिंदे यांनी अमेरिकेतून व्हिडिओ संदेशाद्वारे भावना व्यक्त केल्या, तर मुलगी हर्षाली शिंदे व इतर मान्यवरांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमात रवींद्र शिंदे यांच्या प्रदीर्घ सेवाकाळावर आधारित विशेष चित्रफीत सादर करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आणि उपक्रमांचा प्रभावी आढावा यातून मांडण्यात आला.
शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा ठसा उमटवणाऱ्या रवींद्र शिंदे यांच्या पुढील आयुष्यासाठी उपस्थितांनी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधानाच्या शुभेच्छा दिल्या.