एकलव्य शासकीय आयटीआय (आदिवासी), पालघर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरामहिला सशक्तीकरण, आरोग्य व कायदेविषयक जागरूकतेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन




एकलव्य शासकीय आयटीआय (आदिवासी), पालघर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
महिला सशक्तीकरण, आरोग्य व कायदेविषयक जागरूकतेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पालघर :(प्रतिनिधी) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), पालघर येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य मा. श्री. सचिन परशुराम संखे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुषमा सातपुते (को-ऑर्डिनेटर व असिस्टंट प्रोफेसर, आनंद विश्व गुरुकुल कॉलेज ऑफ लॉ, ठाणे), श्रीमती सीमा केदारी (PDMDS NGO, पालघर), डॉ. ओमकार प्रशांत बोकंद (MBBS – Philippines, FMGE Qualified), श्रीमती रुचिरा भाऊसाहेब सावंत (फॅशन मॉडेल व उद्योजिका, मुंबई), श्री. सोहम पाटील (प्रकल्प व्यवस्थापक, रिलायन्स फाउंडेशन) तसेच श्री. प्रशांत बोकंद (गटनिदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव) उपस्थित होते. संस्थेतील कर्मचारीवृंद व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. यावेळी अनंत भंगाळे यांनी प्रस्ताविकेत जागतिक महिला दिनाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार व सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर श्रीमती सविता सावंत, ज्येष्ठ शिल्पनिदेशक यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करत यंदाच्या “Give to Gain” या थीमचा संदेश मांडला. महिलांप्रती समानता, सन्मान व सशक्तीकरणाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी डॉ. सुषमा सातपुते यांनी महिला सुरक्षा व कायदेविषयक जागरूकतेवर मार्गदर्शन करत महिलांविरुद्ध होणारे अत्याचार, सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणूक याबाबत माहिती दिली. तसेच महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया व आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. ओमकार प्रशांत बोकंद यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करत स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग याविषयी माहिती दिली. लवकर निदान, नियमित तपासणी, ॲनिमिया, मानसिक आरोग्य, मासिक पाळीतील स्वच्छता, लसीकरण व संतुलित आहाराचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
श्रीमती सीमा केदारी यांनी स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) व कंपवात (पार्किन्सन्स) या आजारांविषयी माहिती देत काही सोपे व्यायाम व उपचार पद्धतींची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी श्रीमती रुचिरा भाऊसाहेब सावंत यांनी फॅशन विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत फॅशन क्षेत्रातील अनुभव सांगितले. प्रशिक्षणार्थींनी त्यांच्या सोबत रॅम्प वॉक करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींनी पारंपरिक वेशभूषेत मंगळागौर व तारपा नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पुढील आठवड्यात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सचिन परशुराम संखे यांनी महिलांचा सन्मान, समानता व सशक्तीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. महिलांनी शिक्षण, कौशल्य व आत्मविश्वासाच्या जोरावर स्वावलंबी बनून रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सविता सावंत यांनी केले. चर्चासत्रात प्रशिक्षणार्थींना प्रश्न मांडण्यासाठी श्रीमती उज्वला वीर यांनी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्रीमती रश्मी आवटी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी, इतरेतर कर्मचारी व प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमानंतर रिलायन्स फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. सोहम पाटील यांच्या उपस्थितीत युवा मित्र व रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.