Uncategorized

मुरबे–नांदगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ! मोरोडी येथे गाईच्या वासरावर प्राणघातक हल्ला, नागरिकांत भीतीचे वातावरण

मुरबे–नांदगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ! मोरोडी येथे गाईच्या वासरावर प्राणघातक हल्ला, नागरिकांत भीतीचे वातावरण


पालघर | प्रतिनिधी
मुरबे गावातील मोरोडी परिसरात काल रात्री बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला करून त्याचा मृत्यू केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मुरबे तसेच शेजारील नांदगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे सुमारे एक महिन्यापूर्वी नांदगाव येथील भाट आळी परिसरात बिबट्याचे पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. त्या वेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून बिबट्याचा वावर असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नसल्याने आता प्रत्यक्ष जीवितहानी घडली आहे.
काल रात्री बिबट्याने थेट गोठ्यात घुसून गाईच्या वासरावर हल्ला केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्या अजूनही परिसरातच वावरत असल्याची शक्यता असल्याने महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावणे, रात्री गस्त वाढवणे, सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेरे बसवणे तसेच नागरिकांना सतर्कतेबाबत मार्गदर्शन देणे अशा उपाययोजनांची जोरदार मागणी केली आहे.
“एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही कारवाई झाली नाही. आता वासरू मारले गेले, उद्या माणसाचा जीव गेला तर जबाबदार कोण?”
— संतप्त ग्रामस्थांचा सवाल
जर वेळीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर मुरबे–नांदगाव परिसरात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने केवळ पाहणीपुरती मर्यादित न राहता तात्काळ प्रभावी कृती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button