Uncategorized

राऊत परिवार, पास्थळ यांचे तिसरे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राऊत परिवार, पास्थळ यांचे तिसरे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
पालघर (प्रतिनिधी) : दोनशे वर्षांची ऐतिहासिक व वैभवशाली परंपरा लाभलेल्या पास्थळ गावातील शिणवार व रामा यांच्या राऊत परिवाराचे तिसरे स्नेहसंमेलन कुडण येथील भास्कर पार्कमध्ये दि. २९ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यास परिवारातील विविध पिढ्यांतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय शिणवार दामा राऊत यांचे पणतू तसेच चौथ्या पिढीतील रमेश परशुराम राऊत (माजी शिक्षक, माजी सरपंच व प्रशासक) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष रमेश राऊत, अर्थतज्ञ डॉ. राघवेंद्र राऊत, कुणबी समाजोन्नती संघाचे मनोज घरत तसेच ज्येष्ठ सदस्य चिंतामण राऊत व हेमंत राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महिलांनी गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाला मंगलमय प्रारंभ केला. यानंतर दिवंगत सदस्यांचे चित्रांद्वारे भावपूर्ण स्मरण करण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या माध्यमातून सिद्ध राऊत, नुपूर राऊत व हार्दिक राऊत यांनी दुसऱ्या व तिसऱ्या पिढीतील व्यक्तींचे बोलके चलचित्र सादर केले. जितेश राऊत यांनी परिवाराचा लोगो व स्मृतिचिन्हाची निर्मिती केली.
डॉ. बाबुलनाथ राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना शशिकांत राऊत यांनी सात पिढ्यांची वंशावळ सादर करत परिवार संमेलनाचे महत्त्व अधोरेखित केले. २००२ साली सुरू झालेली ही परंपरा कौटुंबिक मूल्ये, संस्कार व ऐक्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बालमेळावा, व्याख्यानमाला, गुणगौरव सोहळे आदी उपक्रमांची क्षणचित्रे चित्रफितीद्वारे सादर करण्यात आली.
परिवारातील नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींमध्ये सरस्वती मोरेश्वर राऊत, राधाबाई जगन्नाथ राऊत, लक्ष्मीबाई चिंतामण घरत, सीताबाई शिवाजी राऊत व लक्ष्मण गणपत पाटील यांचा शाल, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सहस्त्रचंद्रदर्शन निमित्त डॉ. राघवेंद्र राऊत, मालती जयवंत घरत, रंजना रामदास राऊत, सुशीला रामदास घरत, गणपत ठक्या राऊत, यशोदा यशवंत राऊत व विश्वनाथ त्रिंबक पाटील यांनाही गौरविण्यात आले.
मनुजता राऊत यांनी ‘गुलमोहर’ अंकाची पार्श्वभूमी स्पष्ट करत ‘गुलमोहर अंक ३’ चे संपादकीय विवेचन केले. विविध विषयांवरील लेख, आठवणी, वंशावळ व उपक्रमांची छायाचित्रे समाविष्ट असलेल्या या अंकाचे प्रकाशन रमेश राऊत, डॉ. राघवेंद्र राऊत, महादेव राऊत, सतीश घरत व जगन्नाथ घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांचा परिचय करून देण्यात आला, जो अत्यंत भावनिक ठरला. ७० वर्षांवरील ज्येष्ठांचा विशेष सन्मान करण्यात आला. परिवारातील ९७ वर्षीय सरस्वती मोरेश्वर राऊत यांचा त्यांच्या पाच पिढ्यांसह पालघर नगराध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी संमेलनाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घरत व स्वाती राऊत यांनी केले, तर जयमंगल राऊत यांनी आभार प्रदर्शन केले.
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहित राऊत, सुधीर राऊत, गिरीश राऊत, केतन राऊत, जितेश राऊत, प्रसाद राऊत, रत्नेश राऊत, अनिश राऊत, निखिल राऊत, शशू राऊत, नितिन राऊत, प्रजीत राऊत, पंकज राऊत, विराजित राऊत तसेच महिला वर्गाने विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button