Uncategorized

स्वच्छ भारत मिशनकडे दुर्लक्ष? नानेपाडा नाल्यातून ठाणे खाडीत घनकचरा; जैवविविधतेला धोका

स्वच्छ भारत मिशनकडे दुर्लक्ष? नानेपाडा नाल्यातून ठाणे खाडीत घनकचरा; जैवविविधतेला धोका


मुंबई (प्रतिनिधी : सतीश पाटील) : मुलुंड (पूर्व) येथील नानेपाडा नाला व पूर्व द्रुतगती महामार्ग परिसरातून वाहणारा घनकचरा थेट ठाणे खाडीत जाऊन साचत असल्याने तेथील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. विशेषतः Thane Creek Flamingo Sanctuary या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळाला यामुळे धोका निर्माण होत आहे.
मुलुंड शहरातून वाहून येणारा प्लास्टिक व इतर घनकचरा कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट खाडीत मिसळत असून त्यामुळे कांदळवन (मॅंग्रोव्ह) तसेच माशांच्या प्रजनन स्थळांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. परिणामी, परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्येबाबत २०२४ मध्ये पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने सुमारे १० कोटी रुपयांची तरतूद करून मुलुंड ते विक्रोळी दरम्यानच्या उघड्या नाल्यांवर जाळ्या (Trash Boom) बसवण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून प्लास्टिक व घनकचरा खाडीत जाण्यापासून रोखता येईल.
मात्र, सहा ठिकाणी जाळ्या बसवण्याचे नियोजन असताना आजतागायत केवळ दोन ठिकाणीच या सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उर्वरित ठिकाणी अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
पर्यावरणप्रेमी, समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी प्रशासनाच्या या ढिलाईवर नाराजी व्यक्त करत तातडीने सर्व ठिकाणी जाळ्या बसवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर स्वच्छतेवर भर दिला जात असतानाही अशा प्रकारे घनकचरा थेट खाडीत जाणे ही चिंतेची बाब असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button