Uncategorized

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत

प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंग व फौजदारी गुन्हा दाखल होणार

पालघर(प्रतिनिधी) दिनांक ३० डिसेंबर : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार विक्रमगड तालुक्यातील ९७२ तर डहाणू तालुक्यातील १७५२ कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ३५८६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी (PRO, PO-1, PO-2, PO-3) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी दिनांक २६ व २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रथम प्रशिक्षण तसेच ५ व ६ जानेवारी २०२६ रोजी द्वितीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणास बहुतांश अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत अनुपस्थित कर्मचाऱ्यांसाठी २ जानेवारी २०२६ रोजी पुनःश्च प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर पुनःप्रशिक्षणालाही गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३४ अन्वये शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत केली जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असून, या प्रक्रियेत नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button