मुलुंडमध्ये युतीचा फटका! शिंदे गटातील बंडखोरी उफाळली — प्रमुख नेत्यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.



मुलुंडमध्ये युतीचा फटका! शिंदे गटातील बंडखोरी उफाळली — प्रमुख नेत्यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.
मुलुंड (प्रतिनिधी)मुलुंडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात झालेल्या युतीचा थेट फटका शिंदे गटाला बसताना दिसत आहे. युतीअंतर्गत मुलुंडमधील सर्व जागांवर भाजपचेच उमेदवार उभे करण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या नाराजीचा स्फोट होत शिंदे गटाचे मुलुंड उपप्रमुख विनोद गायकवाड, गुरुज्योत शिंग, माजी नगरसेविका सुजाता राजेश पाठक तसेच मेघा मकरंद साळकर यांनी थेट अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेल्या या नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे रणशिंग फुंकले आहे.
विशेष म्हणजे, मुलुंडमधील जनतेमध्येही या अपक्ष उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण असल्याची जोरदार चर्चा आहे. स्थानिक नेतृत्वाला डावलल्याने नाराज झालेला मतदारवर्ग अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी उभा राहत असल्याचा कौल राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
मुलुंडमधील ही घडामोड शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानली जात असून, येत्या निवडणुकीत याचे पडसाद थेट निकालावर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युतीचा निर्णय शिंदे गटाला किती महागात पडतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.