डॉ. स.दा. (दादा) वर्तक जीवन गौरव पुरस्कार रमेश पानसे यांना जाहीर।

डॉ. स.दा. (दादा) वर्तक जीवन गौरव पुरस्कार रमेश पानसे यांना जाहीर।
बोईसर(प्रतिनिधि):-बोईसर एज्युकेशन सोसायटीकडून पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिंना प्रतिवर्षी देण्यात येणारा डॉ. स. दा. (दादा) वर्तक जीवन गौरव पुरस्कार सन २०२५ साठी ऐना येथील ‘ग्राममंगल’ या संस्थेचे संस्थापक व विश्वस्त रमेश पानसे ह्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला आहे. बोईसर मधील पहिले डॉक्टर व गोरगरीबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. स. दा. वर्तक यांची दि. २० डिसेंबर २०२५ रोजी १९ वी पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देण्यात येणारा हा पुरस्कार शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वाजता डॉ. स. दा. वर्तक विद्यालय बोईसरच्या प्रांगणामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर ह्यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल.पालघर तालुक्यातील पहिले डॉक्टर डॉ. सदाशिव दा. वर्तक हयांनी हया परिसरात वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. डॉ. स. दा. (दादा) वर्तक जीवनगौरव पुरस्कार हा पालघर जिल्हयाच्या ग्रामीण भागातील प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. रु. २५०००/- . स्मृतीचिन्ह व मानपत्र असे हया पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी हा पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना व संस्थाना प्राप्त झाला आहे. श्री.पानसे यांनी 1982 साली डहाणू परिसरातील आदिवासी भागात शिक्षण व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ‘ग्राममंगल’ या संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालशिक्षणामध्ये विविध प्रयोग करून महाराष्ट्रातील व देशातील बालशिक्षणाला दिशा दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्यात देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे. यापूर्वी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, लातूर भूकंप सेवा पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘ज्ञाना’ साठीचा ‘गोंदा’ गौरव पुरस्कार, सह्याद्री वाहिनी ‘शिक्षणरत्न’ पुरस्कार, गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार अशा विविध पुरस्कारानी त्यांना सन्मानित केले आहे
श्री. पानसे ह्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. स. दा. (दादा) वर्तक जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती बोईसर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वर्तक ह्यांनी दिली.