स्वच्छ मनोर, सुंदर मनोर” व “प्लास्टिक मुक्त मनोर” मोहीम सुरू.


“स्वच्छ मनोर, सुंदर मनोर” व “प्लास्टिक मुक्त मनोर” मोहीम सुरू. मनोर (प्रतिनिधी)मनोर ग्रामपंचायत तर्फे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी मनोर बाजार परिसरात पर्यावरण संवर्धन व घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी “स्वच्छ मनोर, सुंदर मनोर” व “प्लास्टिक मुक्त मनोर” मोहीम सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, बाजार परिसरात निर्माण होणारा सुका कचरा गोळा करून स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पालघर यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या सुका कचरा विलगीकरण केंद्र येथे पुढील प्रक्रियेसाठी नेला जाईल. स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये सुका कचरा जाळल्याने व इतरत्र फेकण्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, कचरा विलगीकरण, सुरक्षित विल्हेवाट पद्धती आणि पर्यावरणीय जबाबदारी वाढविण्यासाठी सुका कचरा संकलन पिशव्या आणि माहितीपूर्ण पत्रके वाटण्यावर या मोहिमेत भर देण्यात आला. मनोर मार्केटमधील सुमारे २०० दुकान मालकांनी या उपक्रमात भाग घेतला, ज्यामुळे स्वच्छतेच्या प्रयत्नांना समुदायाचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर या मोहिमेस सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन (CWAS), CEPT रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि HDFC CSR – परिवर्तन उपक्रमची जोड मिळाली व मोलाचे तांत्रिक सहाय्य देखील प्राप्त झाले. या मोहिमेमध्ये मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. नितीन पवार, सरपंच श्री. चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. मनि मनीष भानुशाली, श्रीमती. स्वप्नाली चंपा नेरकर, श्रीमती सुरेखा कासट
.ग्रामपंचायत कर्मचारी व CWAS संस्थेचे प्रतिनिधी श्री. मनिष कुलकर्णी आणि कु. शिवानी पारखी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
मोहिमेदरम्यान, श्री. नितीन पवार यांनी प्लास्टिकवर संपूर्ण बंदी घालण्याच्या ग्रामपंचायतीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि पालन न केल्यास ₹५०० दंडाची घोषणा केली. येत्या काही दिवसांत संपूर्ण बाजारपेठ परिसरात ही मोहीम सुरू राहील, ज्यामध्ये “स्वच्छ मनोर, सुंदर मनोर” व “प्लास्टिक मुक्त मनोर” संकल्पना साध्य करण्यासाठी जनतेच्या सहभागाची जोरदार अपेक्षा असून ग्रामपंचायत यादृष्टीने कार्यरत आहे