दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वारली कलेला नवी ओळख; जिल्हा परिषदेत प्रेरणादायी प्रदर्शन



दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वारली कलेला नवी ओळख; जिल्हा परिषदेत प्रेरणादायी प्रदर्शन
पालघर(प्रतिनिधी ): दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांना स्वावलंबनाकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पालघरमार्फत 39 दिवसांचे वारली पेंटिंगचे विशेष प्रशिक्षण सात दिव्यांग शाळांना देण्यात आले होते. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांच्या आधारे आज जिल्हा परिषद येथे वारली कलेच्या विविध वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करत विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. साध्या माध्यमांतून साकारलेल्या या कलाकृतींमध्ये ग्रामीण जीवन, निसर्ग आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत (सा.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील (पंचायत), कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी तसेच रवींद्र शिंदे यांच्या पत्नी अनिता शिंदे उपस्थित होत्या.
जिल्हा परिषदेमार्फत निलेश मुर्डेश्वर कर्णबधिर विद्यालय, जव्हार; शापरिया कर्णबधिर विद्यालय, पालघर; स्वामी परिज्ञानाश्रम कर्णबधिर विद्यालय, विरार; स्वामी परिज्ञानाश्रम मतिमंद कार्यशाळा, विरार; स्वामी परिज्ञानाश्रम मतिमंद शाळा, विरार; जीवदानी मतिमंद शाळा, वसई तसेच मूकबधिर बालविकास केंद्र, डहाणू या सात शाळांमध्ये वारली पेंटिंगचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारली कलेची बारकावे आत्मसात करत विविध कलाकृती साकारल्या.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच दिव्यांग कल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांच्या नियोजनातून हा संपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या वस्तूंना उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे व इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमादरम्यान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘दिशा’ अभियान अंतर्गत मतिमंद शाळांमध्ये राबविण्यात येणारा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शाळांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी लतिका भाकरे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, समाज कल्याण), मेघा जाधव (सहाय्यक सल्लागार, प्रभारी दिव्यांग कल्याण), सुरेश चव्हाण (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते, दिव्यांग कल्याण) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरला असून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ घडवून आणत स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शक ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.