सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचा केजी टू पीजी उपक्रम


सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचा केजी टू पीजी उपक्रम
पालघर (प्रतिनिधी)पालघर येथील सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या शैक्षणिक विस्तार उपक्रमांतर्गत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय परिसरात नव्या इंग्रजी माध्यमिक शाळेची स्थापना करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. दानशूर मोतीलाल भानुशाली कुटुंबियांच्या आर्थिक सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या श्रीमती हर्षदा मोतीलाल भानुशाली प्राथमिक शाळेच्या आणि संस्था संचालित माध्यमिक शाळेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन शुक्रवार, दि. ०५ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शिक्षण क्षेत्राला नाविन्यपूर्ण शिक्षणाची दिशा देणारा हा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या प्रसंगी दानशूर उद्योजक महेश मोतीलाल भानुशाली यांच्या हस्ते श्रीमती हर्षदा मोतीलाल भानुशाली प्राथमिक शाळेच्या इमारतीचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नीलम महेश भानुशाली यांच्यासह भानुशाली कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे पदाधिकारी, शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर आणि आमंत्रित अतिथी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महत्वपूर्ण उपक्रमाचे साक्षीदार ठरले.
गेल्या सुमारे ५० वर्षांपासून सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी, पालघर जिल्ह्यात अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने योगदान देत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार व स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने संस्थेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भानुशाली कुटुंबाच्या सहकार्याने उभारण्यात येणारी हि नवीन शाळा इमारत पालघर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारी ठरणार आहे.
सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी व अनिल पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश संखे, सुरेश जोशी, सुधीर दांडेकर, भरत राऊत, अमिता राऊत, अमोल वर्तक, निनाद सावे, हिमाली राऊत, रामप्रकाश निराला तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख व डॉ. तानाजी पोळ, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायाल चोलेरा, पंढरीनाथ घोडे, अश्विन भानुशाली, योगेश म्हात्रे, दीपक पिंपळे, विक्की पिंपळे, समाजसेवक जगन्नाथ पावडे तसेच अॅड्. दीपक सावले यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रस्तावित शाळेच्या इमारतीसाठी उदारपणे आर्थिक सहकार्य करणाऱ्या महेश मोतीलाल भानुशाली कुटुंबियांचे संस्थेचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी मनःपूर्वक आभार मानले. श्री. सचिन कोरे यांनी सांगितले की, या नव्या शाळेच्या उभारणीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षांच्या अधिक संधी उपलब्ध होतील.