Uncategorized

वस्तू व सेवाकर कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचा स्नेह मेळावा बोरीवलीत उत्साहात संपन्न…

वस्तू व सेवाकर कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचा स्नेह मेळावा बोरीवलीत उत्साहात संपन्न…..

मुंबई (प्रतिनिधी): विक्रीकर आणि आताचे वस्तू व सेवाकर या शासकीय कार्यालयातील सेवानिवृत्त आणि कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांचा ६ वा स्नेह मेळावा शनिवार दि. २० डिसेंबर, २०२५ रोजी अमिवाडी बॅन्क्वेट हाॅल, बोरिवली पश्चिम, येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर स्नेह मेळाव्यात प्रख्यात योग शिक्षक व समुपदेशक, समाजसेवक – संजय इनामदार, यांनी उत्तम आरोग्य व आहारासंबंधी व आंनदी जगण्याची कला या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त राज्य कर सह आयुक्त – अशोक चवरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून अशा मेळाव्यांचे, उत्साही वातावरण निर्माण करण्याकरिता आवश्यक अशी बाब आणि गरज असल्याचे नमूद करुन उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
सदर मेळाव्यात वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या खात्यातील विठ्ठल धनावडे, तुळशीदास पोळ, कांबळे, नंदिनी मांजरेकर, लीला हडप आणि वैशाली शेडगे या ज्येष्ठ सहकाऱ्यांचा तसेच कार्यरत सहाय्यक राज्यकर आयुक्त . अनिल मुंडे ( वस्तू व सेवाकर विभागातील उल्लेखनीय कार्य) यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात कार्यरत राहून पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सेवानिवृत्त सुरेश विटकर, (योग गुरु), विजय (बाळ) पंडीत, (पत्रकार व सामाजिक कार्य), . रघुनाथ मोहिते(कवी व लेखक), पुरुषोत्तम दाते व संध्या रांगणे(कॅरम पटू) तसेच खात्यातील वरिष्ठ पदांवर पदोन्नत झालेल्या सहकाऱ्यांचा याप्रसंगी यथोचित गौरव करण्यात आला.
स्नेह मेळाव्यात उपस्थित सहकारी कलाकारांनी मनोरंजन कार्यक्रमात कराओके ट्रॅक वर गाणी सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मेळाव्यात लकी ड्रॉ काढून २५ जणांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
स्नेह मेळाव्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या ८ व्या केंद्रीय वेतन आयोगात कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरुच राहणार व मिळणार असल्याचे नमूद करुन अफवांवर विश्वास न ठेवता, व्हाॅटस्अप किंवा इतर अनुषंगिक प्रसार माध्यामातून प्राप्त होणारी माहिती प्रत्येकाने शहानिशा करून घ्यावी, असे सुबोध किर्लोस्कर यांनी सांगितले.
स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रतिमा कांदळगावकर व समाधान सुर्वे यांनी केले. श्रीकांत धुरी यांनी स्नेह मेळावा यशस्वी केल्याबद्दल उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सदर स्नेह मेळावा यशस्वी करण्याकरिता सत्यवान तोंडवळकर, सुरेश चाळके, सुजित सावंत,जय अनसुरकर, शरद मयेकर, विलास कांदळगावकर, चंद्रकांत पाचणेकर, शिल्पा देसाई, वृषाली सावंत, प्रकाश पितळे, किशोर कडुलकर यांनी भरीव योगदान दिले. स्नेह मेळाव्यातील उपस्थितांना कालनिर्णय २०२६ दिनदर्शिका आणि भेटवस्तू देण्यात आली. हास्योन्मादात मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठींनंतर स्नेह मेळाव्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button