Uncategorized

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सुशासन सप्ताह कार्यशाळा संपन्न

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सुशासन सप्ताह कार्यशाळा संपन्न

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे जलदगतीने व पारदर्शकपणे करावीत

…जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड

पालघर, (प्रतिनिधी)दि. २३ डिसेंबर : आपण नागरिकांना कोणत्या सेवा देतो, त्या किती जलद आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचत आहेत, तसेच त्या अधिक प्रभावी कशा करता येतील यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे जलदगतीने व पारदर्शकपणे करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिले.

लोकाभिमुख प्रशासन, जलद सेवा आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुशासन सप्ताह अंतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड होत्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे ,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.जे. गोरे ,उपजिल्हाधिकारी विजया जाधव, तेजस चव्हाण, डिआरडीओच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते , जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे,जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख नरेंद्र पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 कार्यशाळेत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले की, सुशासनाचा खरा अर्थ म्हणजे वर्षातून किमान एकदा तरी प्रशासनाने आत्मपरीक्षण करणे. आपण नागरिकांना कोणत्या सेवा देतो, त्या किती जलद आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचत आहेत, तसेच त्या अधिक प्रभावी कशा करता येतील, यावर सर्वांनी  एकत्र बसून विचारमंथन करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने मंथनात्मक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत सादर करण्यात आलेल्या विविध विभागांच्या सादरीकरणा बाबत समाधान व्यक्त करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले की, उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी सादरीकरणे लक्षपूर्वक ऐकून त्यांचा आशय समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ‘गुड न्यूज’ जाहीर केली. शासनाने पालघर जिल्हा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकस्तर वेतनाचा निर्णय घेतला असून, हा विषय नुकताच मार्गी लागला आहे. या निर्णयामुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनातील कामकाजाचा संदर्भ देत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड म्हणाल्या की, एखादी फाईल अडकल्यास काय वाटते, याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. एका विभागातून दुसऱ्या विभागात अभिप्रायासाठी फाईल फिरत राहणे, निर्णयास होणारा विलंब — याच समस्यांना सामान्य नागरिकही रोज सामोरे जात असतात. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न विहित कालावधीत निकाली काढणे किंवा पुढील टप्प्यावर नेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, याची जाणीव सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.

   कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड  यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  अभिनंदन केले. सुशासन सप्ताहात मिळालेल्या या सकारात्मक निर्णयामुळे आगामी काळात पालघर जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान, संवेदनशील आणि लोकाभिमुख बनेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.

 येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी यशस्वी, सकारात्मक आणि प्रगतीशील ठरो, तसेच सुशासनाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचे नाव राज्यात व देशात उंचावण्याचे कार्य सर्वांनी एकत्रितपणे करावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button