गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरा


गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरा आज महिलांनी यशाची शिखरे गाठली त्याचे मूळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षात आहेत विद्यार्थिनींनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे प्राचार्य डॉ.बी. ए. राजपूत
तलासरी (प्रतिनिधी)दिनांक 03 जानेवारी 2026
आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाने महिला विकास विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यामानाने ‘स्त्री शिक्षणाच्या जननी’ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या सामाजिक क्रांतीला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.ए. राजपूत यांनी आपल्या प्रास्ताविकातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “आजच्या आधुनिक युगात स्त्रिया ज्या शिखरावर आहेत, त्याचा पाया सावित्रीबाईंनी रचला आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी समाज परिवर्तनासाठी दिलेले योगदान अमूल्य असून, प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतली पाहिजे.”
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सहा. प्राध्यापक निलेश साळवे यांनी “आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत, त्याचे सर्व श्रेय सावित्रीबाईंच्या संघर्षाला जाते. त्यांनी केवळ अक्षरे दिली नाहीत, तर महिलांना सन्मानाने जगण्याचे बळ दिले .” या शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित विविध स्वयंरचित व संकलित कविता यांचे सादरीकरण केले.विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचा सामाजिक संघर्ष आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्धचा लढा कवितांच्या माध्यमातून मांडला. “भिडावरचे दगड-शेण झेलणारी माऊली” अशा आशयाच्या कवितांनी उपस्थितांना भावूक केले.काही विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंचे सामाजिक कार्य, मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून केलेले कार्य यावर प्रभावी विचार मांडले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे 220 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एन. पवार , डॉ.वैभव माने , महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अर्जुन होन तसेच इतर सर्व सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते.
वरील कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन करण्यास महिला विकास विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या समिती सदस्य व सर्व सहाय्यक प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका सुजाता गावित तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका हर्षाली दुबळा यांनी केले.